
मुंबई : मलबार हिल येथील एका व्यावसायिकाच्या चोरीचा धनादेश आणि बोगस स्वाक्षरी करून आरटीजीएसद्वारे ४८ लाख रुपये वटविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोन्ही आरोपींना बॅकेच्या सीसीटिव्ही फुटेजवरून बांगुरनगर पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. विशाल यशवंत कदम आणि राकेश देजप्पा करतेरा अशी या दोघांची नावे असून, अटकेनंतर या दोघांनाही स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. जहांगीर खुशरुख रेडिमनी हे व्यावसायिक असून, ते त्यांच्या कुटुंबीयांसोबत नेपीयन्सी रोडवर राहतात. त्यांची एक खाजगी कंपनी असून, या कंपनीत त्यांच्यासह त्यांची आई हबोबी आणि बहिण अलिया हे पार्टनर आहेत. ३१ जुलैला सायंकाळी त्यांना त्यांच्या कुलाबा येथील बँकेच्या मॅनेजरचा फोन आला होता. त्यांच्या कंपनीचा एक धनादेश बँकेत आला असून, हा धनादेश मालाडच्या एका खाजगी बँकेत जमा झाला होता. अज्ञात व्यक्तीने या धनादेशावर ४८ लाखांची रक्कम भरुन ती रक्कम आरटीजीएस स्लिप भरुन एका बँक खात्यात ट्रान्स्फर करण्यास दिला होता. रक्कम मोठी असल्याने बँकेने पेमेंट होल्डवर ठेवले होते.