मुंबई अतिक्रमणमुक्त होण्यासाठी प्राधिकरणांनी पुढाकार घेणे गरजेचे - आशिष शर्मा

मुंबई अतिक्रमणमुक्त करण्यासाठी मुंबई महापालिका नेमक्या काय उपाययोजना करणार
मुंबई अतिक्रमणमुक्त होण्यासाठी प्राधिकरणांनी पुढाकार घेणे गरजेचे - आशिष शर्मा

आडव्या-उभ्या मुंबईचा विकास झपाट्याने होत असतानाच बेकायदा बांधकामांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुंबई अतिक्रमणमुक्त करण्यासाठी मुंबई महापालिका नेमक्या काय उपाययोजना करणार, मुंबईचे विद्रूपीकरण कसे रोखणार, याविषयी मुंबई महापालिकेचे नवनियुक्त अतिरिक्त आयुक्त आशिष शर्मा यांच्याशी केलेली खास बातचीत.

प्रश्न : मुंबई अतिक्रमणमुक्तीसाठी काय ॲक्शन प्लॅन?

आशिष शर्मा : कुठलेही काम एका दिवसात होणे शक्य नाही. अतिक्रमणमुक्त मुंबईसाठी सगळ्याच प्राधिकरणांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. अनधिकृत बांधकामांवर कारवाईसाठी २००४ मध्येच समिती स्थापन करण्यात आली आहे. त्याचे अध्यक्ष मुंबई महापालिका आयुक्त आहेत. १५ जून रोजी म्हाडा, रेल्वे, एमएमआरडीए, जिल्हाधिकारी यांची बैठक झाली. या बैठकीतही अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याबाबत चर्चा झाली आहे. अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी सर्वच प्राधिकरणांनी पुढाकार घेतला तर शक्य होईल. अतिरिक्त आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर मुंबई अतिक्रमणमुक्त, मुंबईच्या सौंदर्यात कशी भर पडेल, यावर अभ्यास सुरू असून, पालिकेच्या २४ सहाय्यक आयुक्तांना विभाग अतिक्रमणमुक्त करण्यासाठी अॅक्शन घ्या, असे निर्देश दिले आहेत.

प्रश्न : मुंबईच्या सौंदर्यीकरणासाठी काय प्लॅन?

आशिष शर्मा : मुंबईत पालिकेच्या माध्यमातून सौंदर्यीकरणाचे काम सुरू आहे. पुलांच्या भिंती रंगवणे, त्याप्रमाणे सब-वेतही सौंदर्यीकरणाचे विचाराधीन आहे. मुंबईत कार्पोरेट कंपन्या असून, या कंपन्यांनी पुढाकार घेतल्यास मुंबईचा चेहरामोहरा बदलण्यास मदत होईल. त्यामुळे अशा कार्पोरेट संस्थांनी पुढाकार घेतल्यास त्यांना आवश्यक त्या संबंधित प्राधिकरणाच्या परवानग्या मुंबई महापालिका मिळवून देईल; पण त्यांनी मुंबईच्या सौंदर्यीकरणासाठी पुढे यावे, असे आवाहन कार्पोरेट संस्थांना करण्यात येत आहे.

प्रश्न : मार्केटच्या नूतनीकरणाचा प्रश्न प्रलंबित आहे. त्याविषयी काय प्लॅन आहे?

आशिष शर्मा : मुंबई महापालिकेची ९२ मार्केट्स असून १७, १६४ गाळेधारक आहेत. भाजीविक्रेत्यास मोठ्या मॉलमध्ये जागा दिल्यास तो नाही म्हणणार नाही. त्यामुळे मार्केटमधील गाळेधारकास काय पाहिजे, त्यांना कशा प्रकारे डिझाईन अपेक्षित आहे, याचा आढावा घेण्यात येत आहे. मार्केट्सची पाहणी करण्यात येत आहे. डिझाईनवर काम करणे गरजेचे असून गाळेधारकांचे समाधान झाले पाहिजे. त्यामुळे लवकरच नवीन लुकमध्ये पालिकेची मार्केट्स दिसतील. शॉपकिपर डिझाईनवर लक्ष केंद्रित केले आहे.

प्रश्न - फेरीवाल्यांचा प्रश्न कसा सुटणार?

आशिष शर्मा : राज्य सरकारने फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्यास मंजुरी दिली आहे; मात्र सध्या नगरसेवक नसल्याने निर्णय घेणे शक्य होत नाही. तरीही पात्र फेरीवाल्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी लवकरच योग्य तो निर्णय घेण्यात येईल.

प्रश्न - अतिधोकादायक इमारतींचा प्रश्न पावसाळ्यात ऐरणीवर येतो. रहिवाशांच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी काय करणार?

आशिष शर्मा : दरवर्षी पावसाळ्यापूर्वी सी वन म्हणजे अतिधोकादायक इमारतींतील रहिवाशांना स्थलांतरित होण्याचे आवाहन केले जाते; पण पर्यायी जागा नसल्याने रहिवासी जाण्यास तयार होत नाहीत. तर काही रहिवासी न्यायालयात गेले आहेत. तरीही अतिधोकादायक इमारतींतील रहिवाशांना पर्यायी घर देण्याबाबत वरिष्ठ पातळीवर योग्य तो निर्णय घेण्यात येईल.

प्रश्न - मुंबई शहर व मुंबई महापालिकेविषयी काय सांगाल?

आशिष शर्मा : पुणे महानगरपालिकेत चार वर्षे काम केले आहे. मुंबईही महाजनकोत काम केले आहे; पण मुंबई महापालिकेत कुठल्याही कामाचा रिझल्ट लगेचच मिळतो, ही चांगली गोष्ट आहे. प्रत्येक गोष्टीचे लगेच समाधान होईल, असे नाही; परंतु मुंबई महापालिकेत समाधान होते, ही समाधानकारक बाब आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in