

मुंबई : मुंबई महानगर क्षेत्रातील सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला १ सप्टेंबरपासून अतिरिक्त कात्री लागणार आहे. मुंबई महानगर प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने बुधवारी ऑटोरिक्षाच्या भाड्यात १ रुपया तर काळी-पिवळी टॅक्सीच्या भाड्यात २ रुपयांची वाढ मंजूर केली आहे.
या नवीन दरवाढीनुसार, सीएनजीवर चालणाऱ्या ऑटोरिक्षाचे किमान भाडे २६ रुपयांवरून २७ रुपये होणार आहे. तर काळी-पिवळी टॅक्सीचे मूळ भाडे ३१ रुपयांवरून ३३ रुपये होईल. हे सुधारित भाडे प्रवासाच्या पहिल्या १.५ किलोमीटरसाठी लागू राहील. हा निर्णय संपूर्ण मुंबई महानगर क्षेत्रातील सर्व ऑटोरिक्षा आणि टॅक्सींसाठी लागू असणार आहे.
१ सप्टेंबरपासून नवीन भाडे लागू होत असल्याने वाहनांमधील इलेक्ट्रॉनिक मीटरचे री-कॅलिब्रेशन करणे बंधनकारक असणार आहे. आरटीओच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑटोरिक्षा आणि टॅक्सी चालकांना मीटर कॅलिब्रेशन पूर्ण करण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. ३० नोव्हेंबरपर्यंत मीटर कॅलिब्रेशन न करणाऱ्या चालकांवर १ डिसेंबरपासून दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई केली जाईल.
दूध दरवाढही लागू
गणेशोत्सव व सणासुदीच्या काळात मुंबईकरांच्या खिशाला कात्री बसणार आहे. १ सप्टेंबरपासून सुट्या दुधाच्या घाऊक दरात ९ रुपयांची वाढ होऊन तो १०२ रुपये प्रतिलिटर होणार आहे. मुंबई दुग्ध उत्पादक संघाने सुट्या म्हशीच्या दुधाच्या घाऊक दरात प्रतिलिटर ९ रुपयांची मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आजपासून मुंबईत सुट्या दुधाचा घाऊक दर ९३ रुपयांवरून थेट १०२ रुपये प्रतिलिटर होणार आहे. हे नवे दर २८ फेब्रुवारी २०२७ पर्यंत पुढील सहा महिन्यांसाठी लागू राहतील. त्यानंतर पुन्हा एकदा याचा आढावा घेण्यात येणार आहे.