अहमदाबाद-मुंबई 'वंदे भारत'चे दरवाजे ४५ मिनिटे बंदच; प्रवाशांना मनस्ताप

अहमदाबाद-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचे दरवाजे तब्बल ४५ मिनिटे बंदच राहिल्याने प्रवाशांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागले.
अहमदाबाद-मुंबई 'वंदे भारत'चे दरवाजे ४५ मिनिटे बंदच; प्रवाशांना मनस्ताप

कमल मिश्रा/मुंबई

अहमदाबाद-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचे दरवाजे तब्बल ४५ मिनिटे बंदच राहिल्याने प्रवाशांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागले. तांत्रिक कारणास्तव दरवाजे उघडलेच नाहीत. वंदे भारत एक्स्प्रेस सूरत स्थानकावर आल्यानंतर दरवाजे उघडत नसल्यामुळे प्रवाशांना ट्रेनमध्ये जाताच आले नाही. अनेक वेळा प्रयत्न केल्यानंतर, अखेर तांत्रिक कर्मचाऱ्यांनी मॅन्यूअली ट्रेनचे दरवाजे उघडावे लागले. त्यामुळे प्रवाशांना ४५ मिनिटे ट्रेनमध्ये आत जाता आले नाही किंवा उतरणाऱ्या प्रवाशांना बाहेर पडण्यासाठी तब्बल ४५ मिनिटे प्रतीक्षा करावी लागली.

या विलंबामुळे वंदे भारत ट्रेनला मुंबई सेंट्रल स्थानकात पोहोचण्यासाठीही उशीर झाला. अखेर दुपारी १२.३५ वाजता ही ट्रेन मुंबई सेंट्रल स्थानकात दाखल झाली. प्रवासी संघटनांनी या घटनेविषयी चिंता व्यक्त केली असून वंदे भारत एक्स्प्रेससारख्या भारताच्या दर्जेदार रेल्वेसेवेच्या सुरक्षिततेबाबत तसेच विश्वासार्हतेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या घटनेची चौकशी केली असता, पश्चिम रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “सी-२० डब्याचे दरवाजे तांत्रिक कारणास्तव बंद झाल्यामुळे सर्व डब्यांचे दरवाजे उघडू शकले नाहीत. तांत्रिक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी ही तांत्रिक चूक दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला, अखेर ५० मिनिटांच्या विलंबाने ही ट्रेन सूरत येथून मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात आली.”

logo
marathi.freepressjournal.in