

मुंबई : ‘आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपचा’ या ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून घरोघरी जाऊन मुंबईकरांच्या सूचना आणि अपेक्षा जाणून घेण्यासाठी एक व्यापक तीन दिवसीय अभियान राबवले जाणार आहे. शुक्रवार, शनिवार आणि रविवार या तीन दिवसांत हे अभियान संपूर्ण मुंबईभर मोठ्या प्रमाणात राबविण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी दिली.
या अभियानाचा उद्देश म्हणजे नागरिकांच्या मतांवर आधारित मुंबईची आगामी धोरणे व उपक्रमांची आखणी करणे आहे. भाजप कार्यकर्ते घरोघरी, रेल्वे स्टेशनवर, कॉलेज परिसरात तसेच समाजातील सर्व स्तरातील लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्या सूचना नोंदवतील. ‘घर चलो अभियान’च्या धर्तीवर हे उपक्रम राबवले जाणार असून प्रतिष्ठित नागरिक, विद्यार्थी आणि सामान्य मुंबईकर यांच्याशी थेट संवाद साधण्यात येईल, असेही आमदार अमित साटम यांनी सांगितले.
शुक्रवारी सकाळी ६.३० वाजता अमित साटम नॅशनल पार्कला भेट देतील. रविवारी सकाळी ६.३० वाजता ते मरीन ड्राइव्ह येथे भेट देणार आहेत. तसेच शुक्रवारी दुपारी ३ वाजता ते सुप्रसिद्ध अभिनेते पद्मश्री अशोक सराफ यांची भेट घेऊन या उपक्रमाबाबत संवाद साधतील.
