बेस्टच्या दुर्लक्षामुळे बस स्थानके, चौक्यांना टाळे बस स्थानकातच पे अँड पार्क

बस स्थानके बंद केल्याने प्रवाशांचे मेगा हाल
BEST
BEST
Published on

मुंबई : प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा दावा बेस्ट उपक्रमाकडून करण्यात येतो; मात्र बेस्टच्या मालकीचे बस स्थानक, चौक्या गेल्या काही वर्षांत बंद करण्यात आल्या आहेत. अनेक बस स्थानकांचे रुपांतर पे अँड पार्कमध्ये कर्मचाऱ्यांची गैरसोय होत आहे, तर बस स्थानके बंद केल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. परिवहन विभागातील अधिकारी वर्ग सेवानिवृत्त होत असून, रिक्त पदे भरली जात नाही. यामुळे चौक्यांवर कोणी कर्मचारी उपलब्ध नसल्याने बेस्ट उपक्रमावर चौक्या बंद करण्याची वेळ ओढावली आहे. बेस्ट उपक्रमाचा ढिसाळ कारभार व दुर्लक्षामुळे बस स्थानके व चौक्या बंद पडत असल्याचा आरोप कामगार संघटनांनी केला आहे.

प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा दावा बेस्ट उपक्रमाकडून करण्यात येतो; मात्र बेस्टच्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त नंतर मिळाणारे लाभ, बस स्थानके बंद होत असल्याने प्रवाशांना दूर जाऊन दुसरीकडून बस पकडणे, बसेसचा ताफा कमी होत प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागणे आणि बेस्ट उपक्रमाच्या महसुलात घट होत आहे. या गंभीर प्रश्नाकडे तर दुर्लक्ष होत आहेच. त्यात गेल्या काही वर्षांत बस स्थानके बंद पडणे, चौक्या बंद पडणे हे बेस्ट उपक्रमाच्या दुर्लक्षामुळे होत आहे, असा आरोप कामगार संघटनांनी केला आहे.

चलो अॅप, डिजिटल तिकीट प्रणाली, वातानुकूलित इलेक्ट्रीक बसेस अशा विविध सुविधा बेस्ट उपक्रमाने प्रवाशांना उपलब्ध करून दिल्या असल्या तरी प्रत्यक्षात बस स्थानकांवर प्रवाशांना आजही बसेसची प्रतीक्षा करावी लागते. बेस्ट बसेसचा ताफा कमी असल्याने प्रवाशांना ताटकळत उभे रहावे लागते. बेस्ट बसेसचा ताफ्यात वाढ करत २०२७ पर्यंत १० हजार बसेस त्याही वातानुकूलित इलेक्ट्रीक असतील, असा दावा बेस्ट उपक्रमाकडून करण्यात येत आहे; मात्र प्रत्यक्षात असलेल्या बेस्टच्या मालकीच्या बसेसची संख्या घटत त्या बसेसची दुरवस्था झाली आहे. त्यात बस स्थानके, चौक्या बंद होत असून, प्रवाशांचे हाल होत आहेत.

दरम्यान, याबाबत बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापकांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, व्हाट्सअॅपवर विचारणा केली; मात्र त्यांनी या विषयी काही भाष्य केले नाही.

बस चौक्या बंद

स्वामी दयानंद सरस्वती चौक, फोर्ट मंडई २८ , ६६ , १२६

संत गाडगे महाराज चौक सात रस्ता ७८ १७२

राम गणेश गडकरी चौक शिवाजी पार्क ३५४

हुतात्मा चौक ४ मर्यादित ८

वरळी दुग्ध शाळा - १७१

बाबुल नाथ - ६४ ८० मर्यादित

माहिम मच्छीमार कॉलनी ६१

बंद बस स्थानके

महेश्वरी उद्यान ६४ १६५ , १८२

ताडदेव बस स्थानक ३०५ , ३८५

अंबिका मिल बस स्थानक १७२

गोवंडी बस स्थानक ९३ मर्यादित

वझीरा नाका बस स्थानक

दामू नगर बस स्थानक

चेंबूर वसाहत बस स्थानक ४६३

बस स्थानकाचा वापर पे अँड पार्कसाठी

-डॉ. आंबेडकर उद्यान चेंबूर बस स्थानक येथून एकही बस सुटत नाही. प्रवाशांसाठी असलेल्या बस स्थानक आता पे अँड पार्क साठी केला जात आहे. पे अँड पार्क साठी येथील बस गाड्या बंद केल्या आहेत.

-महेश्वरी उद्यान येथील बस स्थानक सोमवारपासून बंद करण्यात आले आहे. येथे पूर्वीपासून शाळेच्या बस गाड्याचे पे अँड पार्क होते व आजही आहे; मात्र येथून एकमेव सुटणारी १६५ क्रमांकाची बस आता वडाळा आगारातून सोडण्यात येणार आहे

-अंबिका मिल बस स्थानकातून सुटणारी एकमेव २७२ क्रमांकाची बस बंद करून आता बेस्टच्या विद्युत विभागासाठी गोडाऊन व भंगार यार्ड या ठिकाणी बनवण्यात आली आहे.

भूमाफियांचा कब्जा!

बेस्ट उपक्रमाची बस स्थानके कर्मचाऱ्यांअभावी बंद करण्यात येत आहे. भविष्यात नवीन चौकी अधिकारी किंवा बस स्थानक अधिकारी यांची नवीन भरती करणे बेस्ट उपक्रमाची इच्छाशक्ती दिसत नाही. त्यामुळे बस स्थानके, चौक्या बंद होत असून बेस्ट उपक्रमाचे असेच दुर्लक्ष झाल्यास त्या जागेवर भूमाफियांचा कब्जा असेल, अशी भीती प्रवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया

खासगीकरणाचा डाव - शशांक राव

बेस्ट उपक्रमातील कर्मचारी, प्रवासी यांच्या अनेक समस्या आहेत. गॅरेजचे प्रश्न, उपहारगृह बंद होत आहे. या सगळ्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. बस स्थानके, चौक्या बंद होत बस स्थानके बंद केल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. परंतु हे सगळे करण्यामागे बेस्ट उपक्रमाचा हेतू खासगीकरण करणे हा आहे.

शशांक राव, अध्यक्ष, बेस्ट वर्कर्स युनियन

logo
marathi.freepressjournal.in