वेळकाढूपणा टाळा, तातडीने भूमिका मांडा; हायकोर्ट

ईडीला बुधवारचा अल्टीमेटम; सदानंद कदम यांच्या जामीनावर सुनावणी
वेळकाढूपणा टाळा, तातडीने भूमिका मांडा; हायकोर्ट

मुंबई : दापोलीतील साई रिसॉर्ट बांधकाम प्रकरणी अटकेत असलेल्या व्यावसायिक सदानंद कदम यांच्या जामीन अर्जावर वेळ काढूपणा करणाऱ्या ईडीचा उच्च न्यायालयाने चांगलाच समाचार घेतला. न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे भान ठेवा, असा सल्ला देताना जामीन अर्जावर भुमीका मांडण्यासाठी वेळ लागतोच का? असा संतप्त सवाल उपस्थित करताना कदम यांच्या जामीनावर युक्तिवाद पूर्ण करण्यासाठी ईडीला आज बुधवारचा अल्टीमेटम दिला.

दापोली येथील साई रिसॉर्टच्या बांधकामाशी संबंधित कथित आर्थिक अफरातफर प्रकरणात सदानंद कदम यांना ईडीने मार्चमध्ये अटक केली. विशेष पीएमएलए न्यायालयाने कदम यांचा जामीन फेटाळला. त्या विरोधात कदम यांच्या वतीने अ‍ॅड. प्रेरणा गांधी यांनी उच्च न्यायालयात आव्हान देताना जामीनसाठी अर्ज दाखल केला.या याचिकेवर मंगळवारी न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्यासमोर दिवसभर सुनावणी झाली. यावेळी ज्येष्ठ वकील अमित देसाई यांनी जोरदार युक्तिवाद करताना ईडीच्या कारवाईवर तीव्र आक्षेप घेतला. पर्यावरण संरक्षण कायद्याच्या ज्या कलमांतर्गत आरोप केला जात आहे, तो प्रेडीकेट गुन्हा बनत नसतानाही अर्जदार सदानंद कदम हे मागील नऊ महिने तुरुंगात आहेत, याकडे लक्ष वेधतानाच अ‍ॅड. अमित देसाई यांनी उच्च व सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निकालांचा संदर्भ दिला. तर ईडीने जामीन अर्जावर युक्तीवाद करण्यासाठी न्यायालयाकडे वेळ मागितला. याची गंभीर दखल न्यायालयाने घेतली.

जामीन अर्जाच्या सुनावणीला दिरंगाई होता कामा नये तातडीने सुनावणी घेऊन निर्णय द्या. असे निर्देशच सर्वोच्च न्यायालयाचे दिले आहेत. या निर्देशांची तुम्हाला जाणीव नाही का? तुम्ही आजच तातडीने युक्तिवाद पूर्ण करायला हवा होता; मात्र हे काम उद्यावर ढकलले जात आहे. तुम्हाला उद्याच्या एका दिवसात युक्तिवाद पूर्ण करावाच लागेल. आता वेळकाढूपणा खपून घेतला जाणार नाही, अशी ईडीला समज देताना कदम यांच्या जामीन अर्जावर बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी सुनावणी निश्चित केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in