धातूमिश्रीत मांजाचा वापर टाळा; वीजतारांपासून दूर राहा; पतंग उडवताना खबरदारी घेण्याचे महावितरणचे आवाहन

तीळ-गुळाच्या गोडव्यासह निळ्या आकाशी उंच भरारी घेणारे पतंग मकरसंक्रांतीचा आनंद द्विगुणित करतात.
धातूमिश्रीत मांजाचा वापर टाळा; वीजतारांपासून दूर राहा; पतंग उडवताना खबरदारी घेण्याचे महावितरणचे आवाहन
Published on

मुंबई : तीळ-गुळाच्या गोडव्यासह निळ्या आकाशी उंच भरारी घेणारे पतंग मकरसंक्रांतीचा आनंद द्विगुणित करतात. लहानग्यांसह ज्येष्ठ मंडळीही पतंग उडविण्याची मौज लुटतात. मात्र पतंग उडवताना पतंग, पतंगाचा मांजा विद्युत खांब, रोहित्रे, विद्युत वाहिन्या या वीज वितरण यंत्रणांच्या संपर्कात आल्याने अपघाताच्या घटना घडण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसात वाढले आहे. याबाबत खबरदारी घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

पतंग उडवताना विद्युत यंत्रणेपासून सुरक्षित अंतर राखावे, असेही वीज वितरण कंपनीने केले आहे. याबाबत कंपनीने म्हटले आहे की, शहरी व ग्रामीण भागात वीज वितरणासाठी आवश्यक पायाभूत सुविधांचे जाळे सुदूर पसरलेले आहे. दुर्घटना व अपघात टाळण्यासाठी पतंग उडवताना या यंत्रणेपासून दूर राहून मोकळ्या मैदानांचा वापर करावा. वीजवाहिन्या, खांबावर अडकलेली पतंग वा मांजा काढण्याचा प्रयत्न टाळावा. कारण विद्युत वाहिन्यांच्या परस्पर घर्षणाने शॉर्टसर्किट होऊन जीवित वा वित्तहानीची शक्यता असते. घराच्या गच्चीवरून, रोहित्रांवर चढून विद्युत तारांमध्ये अडकलेला पतंग काढण्याचा प्रयत्न टाळावा. वीजवाहिन्यांत अडकलेले पतंग काढण्यासाठी दगडाला दोरा बांधून वाहिन्यांवर फेकू नये. धातुमिश्रीत मांजाचा वापर टाळावा.

आपत्कालीन स्थितीतील संपर्क

आपत्कालीन परिस्थितीमध्ये महावितरणच्या संबंधित शाखा कार्यालयाशी तसेच ग्राहक सुविधा केंद्राच्या १८००-२३३-३४३५ किंवा १८००-२१२-३४३५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in