

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज अंतिम तारीख असून सर्वंच राजकीय पक्षांनी बंडखोरी टाळण्यासाठी लपवाछपवीचा मार्ग अवलंबला आहे. मात्र, सोमवारी उमेदवारांची यादी जाहीर होऊ लागल्यानंतर सर्वंच राजकीय पक्षांत बंडखोरी उफाळून आली आहे. त्यामुळे बंडखोरांची नाराजी दूर करण्याचे मोठे आव्हान राजकीय पक्षांसमोर उभे ठाकले आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सोमवारी दुपारनंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, ठाकरे सेना व मनसे यांनी आपले काही उमेदवार जाहीर केले. मात्र, यात काही निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलले गेल्याने सर्वंच राजकीय पक्षातील इच्छुकांनी नाराजीचा सूर आळवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) मुंबईतील जे मोजके माजी नगरसेवक होते, त्यातील मुंबई अध्यक्ष राखी जाधव, बबन कनावजे, धनंजय पिसाळ, मनीषा रहाटे या चारही माजी नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन दुसऱ्या पक्षात प्रवेश केला आहे. यातील अनुक्रमे तीन माजी नगरसेवकांनी पक्षाचे गटनेते म्हणून पदे भूषविली आहेत.
नाराज निष्ठावंतांनी मारल्या उड्या
मनसे नेत्या स्नेहल जाधव, भाजप नेत्या अर्चना पाटील यांनी ठाकरे सेनेत प्रवेश केला, तर शरद पवाराच्या राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्षा राखी जाधव भाजपात दाखल झाल्या. ठाकरे सेनेचे चंद्रकांत वायंगणकर यांना उमेदवारी डावलली गेल्याने वायंगणकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे.
अनिल परब व वरुण सरदेसाईंमध्ये खडाजंगी
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचा दिवस बाकी असल्याने मोठी लगबग सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटात प्रभाग क्रमांक ९५ च्या उमेदवारीवरून आमदार अनिल परब आणि वरुण सरदेसाई यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. परब माजी नगरसेवक चंद्रकांत वायंगणकर यांच्यासाठी आग्रही होते, तर सरदेसाई यांनी दिवंगत नेते श्रीकांत सरमळकर यांच्या जावयासाठी अर्ज मागितल्याने परब संतप्त झाले. अखेर, परब यांनी माघार घेतल्याने शास्त्री यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. मात्र, यावेळी परब आणि सरनाईक यांच्यातील अंतर्गत मतभेद समोर आले.