बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण : बिष्णोईच्या इशाऱ्यावरूनच हत्या; २६ आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल

राष्ट्रवादीचे नेते झियाउद्दीन अब्दुल रहिम सिद्धीकी ऊर्फ बाबा सिद्धीकी यांच्या हत्येप्रकरणी २६ आरोपीविरुद्ध गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी मोक्का न्यायालयात ४,५९० पानाचे आरोपपत्र सादर केले असून त्यात १८० जणांची जबानी नोंदविण्यात आली आहे.
बाबा सिद्दीकी
बाबा सिद्दीकी संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते झियाउद्दीन अब्दुल रहिम सिद्धीकी ऊर्फ बाबा सिद्धीकी यांच्या हत्येप्रकरणी २६ आरोपीविरुद्ध गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी मोक्का न्यायालयात ४,५९० पानाचे आरोपपत्र सादर केले असून त्यात १८० जणांची जबानी नोंदविण्यात आली आहे.

आरोपपत्रात तिघांना वॉण्टेड आरोपी दाखविण्यात आले आहे. त्यात मोहम्मद यासिन अख्तर ऊर्फ मोहम्मद जमील ऊर्फ जिशान अख्तर ऊर्फ मोहम्मद जसीन ऊर्फ अख्तर ऊर्फ जुल्मी ऊर्फकेही ऊर्फ जस्सी, शुभम रामेश्‍वर लोणकर ऊर्फ शुब्बू आणि अनमोल लविंदरसिंग बिश्‍नोई ऊर्फ भानू ऊर्फ भाईजी ऊर्फ एबी भाई यांचा समावेश आहे.

अनमोल बिष्णोईच्या इशाऱ्यावरून बाबा सिद्धीकी यांची हत्या केल्याचा आरोप पोलिसांनी आरोपपत्रात केला आहे. ज्या २६ आरोपींविरुद्ध सोमवारी आरोपपत्र दाखल करण्यात आले, त्यात गुरमेल बलजीत सिंग, धर्मराज राधे कश्यप, प्रवीण रामेश्‍वर लोणकर, हरिशकुमार बालकराम निशाद, नितीन गौतम सप्रे, प्रदीप दत्तू ठोंबरे, चेतन दिलीप पारधी, संभाजी किसन पारधी, राम फुलचंद कनोजिया, भगवतसिंग ओमसिंग, अमीत हिसमसिंग कुमार, रुपेश राजेंद्र मोहोळ, करण राहुल साळवे, शिवम अरविंद कोहाड, सुजीत सुशील सिंग, गौरव विलास आपुणे, आदित्य राजू गुळणकर आणि रफिक नियाज शेख, शिवकुमार गौतम ऊर्फ शिवा बालकिशन गौतम, अनुराग राधेश्याम कश्यप, ज्ञानप्रकाश प्रदीपकुमार त्रिपाठी, आकाश बृजकुमार श्रीवास्तव आणि अखिलेंद्र प्रतापसिंह सुरेशसिंह, आकाशदिप कारजसिंग गिल, सलमानभाई इक्बालभाई बोहरा, सुमीत दिनकर वाघ यांचा समावेश आहे. यातील गुरमेल, धर्मराज आणि शिवकुमार हे तिघेही मुख्य शूटर आहेत.

१२ ऑक्टोबर २०२४ रोजी वांद्रे येथील राष्ट्रवादीचे नेते आणि माजी राज्यमंत्री बाबा सिद्धीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या गोळीबारानंतर पळून जाणार्‍या गुरमेल सिंग आणि धर्मराज कश्यप या दोघांनाही पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्या चौकशीतून या संपूर्ण कटाचा पर्दाफाश झाला होता. त्यानंतर वेगवेगळ्या परिसरातून २४ आरोपींना गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी अटक केली होती. या सर्वांविरुद्ध नंतर मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच काही आरोपींना पुन्हा अटक करून त्यांची चौकशी करून जबानी नोंदविण्यात आली होती. याच गुन्ह्यांत सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत होते.

सोमवारी २६ आरोपींविरुद्ध गुन्हे शाखेने मोक्का न्यायालयात आरोपपत्र सादर केले आहे. ४५९० पानांच्या या आरोपपत्रात १८० जणांची जबानी नोंदविण्यात आली आहे. या गुन्ह्यात ते सर्वजण साक्षीदार आहेत. १८० भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत ७४ तर १८३ भारतीय न्याय संहिता कलमांतर्गत १४ जणांची साक्ष नोंदविण्यात आली आहे. या गुन्ह्यांत आतापर्यंत पोलिसांनी पाच देशी बनावटीचे पिस्तूल, रिव्हॉल्व्हर, सहा मॅगझीन, ८४ जिवंत काडतुसांचा साठा जप्त केला आहे.

आता नियमित सुनावणी

आरोपपत्र दाखल झाल्याने या खटल्याची आता नियमित सुनावणी होणार आहे. आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी यासाठी भक्कम पुरावे असल्याचा दावाच पोलिसांकडून करण्यात आला आहे. गुन्हेगारी जगतात स्वत:चे टोळी वर्चस्व स्थापन करण्यासाठी बिश्‍नोई टोळीचा मुख्य आरोपी अनमोल बिश्‍नोई याने त्याच्या सहकाऱ्यांच्या मदतीने बाबा सिद्धीकी यांची गोळ्या झाडून हत्या केली होती.

logo
marathi.freepressjournal.in