मुंबई : कुठलेही कंत्राट देताना त्या कंत्राटदाराला संबंधित कामाचा अनुभव आहे का याची खात्री करून कंत्राट देण्यात येते; मात्र वांद्रे पश्चिमेकडील उत्तुंग इमारतींचे सुशोभीकरण करण्यासाठी पर्जन्य वाहिन्या, झोपडपट्टीत गटारे दुरुस्तीचा अनुभव असलेल्या कंत्राटदाराला काम देण्यात आले आहे. यासाठी मुंबई महापालिका तब्बल ८२ लाख ६९ हजार रुपये खर्चणार आहे; मात्र ज्या कामाचा अनुभव नाही त्या कंत्राटदाराला काम देणे म्हणजे अजब पालिकेचा गजब काम, अशी टीका विरोधकांनी केली आहे.
मुंबईचे सौंदर्यीकरण प्रकल्पात आता उंच इमारती थ्रीडी भित्तिचित्रांनी सुशोभीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कामासाठी पालिकेने ७० लाख ६५ हजार रुपये खर्चाचा अंदाज व्यक्त केला होता. कामासाठी मागवलेल्या निविदांमध्ये दोन कंत्राटदार पात्र ठरले. एम. के. इन्फ्राटेक्ट या कंत्राटदाराने दोन टक्के अधिक दरासह ७२ लाख ७ हजाराची तर शीतल इन्फ्राप्रोजेक्ट्स या कंत्राटदाराने ३ टक्के उणे दराने ६८ लाख ५४ हजारांची बोली लावली होती. यापैकी कमी खर्चाची निविदा असलेल्या शीतल इन्फ्राप्रोजेक्ट्सला हे कंत्राट देण्यात आले आहे.
सौंदर्यीकरणावर आजपर्यंत ६१७ कोटींचा खर्च
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर मुंबई महापालिकेने सौंदर्यीकरणाचे काम हाती घेतले असून, यासाठी तब्बल १,७२९ कोटी रुपये खर्चणार आहे. या प्रकल्पात नागरिकांसाठी मोकळ्या जागांची निर्मिती, वाहतूक बेटे, उद्याने, पदपथ, विजेचे खांब, उड्डाणपूल, सार्वजनिक भिंतींची सुधारणा, सुशोभीकरण यावर भर दिला आहे. ऑगस्टपर्यंत या सौंदर्यीकरण प्रकल्पात एकूण १,१९६ कामांचे कार्यादेश देण्यात आले आहेत. यापैकी ९५१ कामे पूर्ण झाली आहेत. यामध्ये शहर विभागातील २८९, तर उपनगरांमधील ६६२ कामांचा समावेश आहे. प्रकल्पावर आजपर्यंत ६१७ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे.