प्रदूषण नियमांचे तीन तेरा; बुलेट ट्रेन, मेट्रोसह ४७४ बांधकामांना नोटीस

मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावल्याने प्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करणारे पालिका प्रशासनाच्या रडारवर आले आहेत. प्रदूषण नियंत्रणाचे नियम मोडणाऱ्या बुलेट ट्रेन, मेट्रोसह ४७४ बांधकामांना पालिकेने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
हवेची गुणवत्ता खालावल्याने मुंबईत भर दुपारीही धुक्याची चादर पसरली आहे.
हवेची गुणवत्ता खालावल्याने मुंबईत भर दुपारीही धुक्याची चादर पसरली आहे. (छाया : सलमान अन्सारी)
Published on

मुंबई : मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावल्याने प्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करणारे पालिका प्रशासनाच्या रडारवर आले आहेत. प्रदूषण नियंत्रणाचे नियम मोडणाऱ्या बुलेट ट्रेन, मेट्रोसह ४७४ बांधकामांना पालिकेने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच पुढील आठवडाभरात पालिकेकडून पुन्हा झाडाझडती घेण्यात येणार असून पूर्तता करण्यासाठी तीन दिवसांची अंतिम नोटीस बजावण्यात येणार आहे. तीन दिवसांच्या कालावधीत संबंधितांनी प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजना केल्या नाहीत, तर थेट स्टॉप वर्कची कारवाई करण्यात येईल, असे पालिकेकडून सांगण्यात आले.

ऑक्टोबरपासून मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावते आणि मुंबईला प्रदूषणाचा विळखा बसतो.‌ विशेष करून हिवाळ्यात हवेची गुणवत्ता खालावत असल्याचे निदर्शनास आले आहे. मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावण्यास मुंबईतील पाच हजार बांधकामे कारणीभूत असल्याचे पालिकेच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे गतवर्षी पालिकेने कठोर कारवाई करीत १५ ऑक्टोबर रोजी २७ प्रकारची नियमावली जाहीर केली आहे. या नियमांमध्ये वाढ करताना यावर्षी बांधकामांच्या ठिकाणी स्वयंपाक बनवण्यास, शेकोटी पेटवण्यासही बंदी घालण्यात आली आहे. यानुसार पालिकेच्या वॉर्ड स्तरावर सब इंजिनीयरच्या टीमच्या माध्यमातून बांधकामांची पाहणी करून प्रदूषण नियंत्रणाची नियमावली पाळण्यात आली नसल्यास कारवाई करण्यात येत आहे.

या कारवाईचा वेग वाढवण्यात आला असून पालिकेने मुंबई सेट्रल आणि महालक्ष्मी दरम्यानच्या मेट्रो स्टेशन कामाला आणि बीकेसी येथील बुलेट ट्रेनच्या कामालाही कारणे दाखवा नोटीस बजावल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मुंबईत सध्या मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. त्याचा फटका हवेच्या गुणवत्तेला बसत आहे. मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावली आहे. त्यात अलिकडच्या काही वर्षांत वाढ झाल्याचे दिसते. त्यामुळे सकाळच्या सत्रात मुंबईतील काही भागांत धुक्याची चादर पसरलेली दिसते. दरम्यान खालावत चाललेली हवेची गुणवत्ता रोखण्यासाठी मुंबई पालिका सतर्क झाली आहे. प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेने नियमावली केली आहे. या नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्यांवर पालिकेतर्फे नोटीस बजावण्यात येत आहे. त्यानुसार प्रदूषण नियंत्रणाचे नियम मोडणाऱ्या बुलेट ट्रेन, ४७४ बांधकामांना पालिकेने नोटीस बजावली आहे.

अशा प्रकारे नियम धाब्यावर!

पोल्युशन मॉनेटरिंग मशीनची कमतरता

बांधकामाजवळ वॉटर स्प्रिंक्लरची कमतरता

बांधकामाजवळ पॉल्युशन मॉनेटरिंग रेकॉर्ड नाही

माती - डेब्रीजच्या गाड्यांच्या चाकांची धुलाई बंद

इलेक्ट्रिक शेगडी उपलब्ध नाही, चुलीवर जेवण

logo
marathi.freepressjournal.in