स्वीकृत नगरसेवक आपटेचा राजीनामा; बदलापुरात भाजपने बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील सहआरोपीची वर्णी लावल्याने गदारोळ

बदलापूरमधील बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील सहआरोपी आणि बदलापूर कुळगाव नगरपालिकेतील भाजपचे स्वीकृत नगरसेवक तुषार आपटे याने अवघ्या २४ तासांत नगरसेवकपदाचा राजीनामा दिला आहे.
स्वीकृत नगरसेवक आपटेचा राजीनामा; बदलापुरात भाजपने बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील सहआरोपीची वर्णी लावल्याने गदारोळ
Published on

बदलापूर : बदलापूरमधील बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील सहआरोपी आणि बदलापूर कुळगाव नगरपालिकेतील भाजपचे स्वीकृत नगरसेवक तुषार आपटे याने अवघ्या २४ तासांत नगरसेवकपदाचा राजीनामा दिला आहे. बदलापूर अत्याचार प्रकरणात सहआरोपी असलेल्या तुषार आपटे याची भाजपने शुक्रवारी स्वीकृत नगरसेवकपदी वर्णी लावली होती. त्यावरून मोठा गदारोळ झाल्याने भाजपच्या वरिष्ठांनी याची गंभीर दखल घेत झाडाझडती घेतली. त्यामुळे पक्षाच्या वरिष्ठांकडून स्पष्ट संदेश मिळाल्याने नामुष्की टाळण्यासाठी पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या चोवीस तासातच आपटे यांनी स्वीकृत नगरसेवकपदाचा राजीनामा दिला. पक्षाच्या आदेशानंतर वरिष्ठांकडे त्यांनी आपला राजीनामा दिला.

स्वखुशीने राजीनामा देत असल्याचे पत्र

तुषार आपटेंनी शनिवारी दुपारी कुळगाव बदलापूर नगर परिषदेत येऊन उपमुख्याधिकारी केतन गुजर यांच्याकडे स्वीकृत नगरसेवक पदाचा राजीनामा सुपूर्द केला. आपण पदाधिकारी असलेल्या संस्थेला आणि भाजपला त्रास होऊ नये यासाठी स्वखुशीने हा राजीनामा देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. कुळगाव- बदलापूर नगर परिषदेच्या अलीकडेच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने नगराध्यक्ष पदासह २२ जागा जिंकल्या. भाजपशी युती करणाऱ्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीनेही ३ जागा जिंकल्या. तर शिवसेनेला २४ जागा मिळाल्या आणि भाजप- राष्ट्रवादी युतीकडे पालिकेची सत्ता आली. त्यानंतर पार पडलेल्या पहिल्या सर्वसाधारण सभेत शुक्रवारी उपनगराध्यक्षसह ५ स्वीकृत नगरसेवकांची निवड करण्यात आली. त्यामध्ये संख्याबळानुसार भाजपा राष्ट्रवादी युतीने ३ तर शिवसेनेने २ जणांची स्विकृत नगरसेवक पदी वर्णी लावली. त्यामध्ये भाजपने त्यांच्या वाट्याला आलेल्या २ पैकी १ स्वीकृत नगरसेवकपदी तुषार आपटे यांना संधी दिली.

निवडणुकीत काम केल्याची पोचपावती

बदलापुरात ऑगस्ट २०२४ मध्ये विद्यार्थिनी अत्याचार प्रकरण समोर आले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यास मोठा वेळ लागला. त्यातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला. तर या अत्याचार प्रकरणाची माहिती असतानाही तक्रार करण्यास असमर्थता दाखवल्याने शाळा प्रशासनातील पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात तुषार आपटे यांनाही अटक झाली होती. त्यानंतर दोनच दिवसात त्यांचा जामिनही झाला होता. या प्रकरणामुळे बदलापूर शहरात मोठा गदारोळ झाला होता. मात्र यंदाच्या निवडणुकीत पक्षासाठी काम केल्याची पोचपावती म्हणून भाजपाने त्यांना स्विकृत नगरसेवक पद देऊ केले होते. त्यावर सर्वच राजकीय पक्षांतून संताप व्यक्त केला जात होता. शिवसेनेचे उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनी यावर टीका केली होती. तर मनसेचे अविनाश जाधव यांनी बदलापुरात मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. अखेर शनिवारी २४ तासांच्या आत, तुषार आपटे यांनी आपला राजीनामा पालिकेच्या उपमुख्याधिकाऱ्यांकडे सादर केला.

मनसेचा फटाके वाजवून जल्लोष

भाजपचे स्वीकृत नगरसेवक तुषार आपटे याने राजीनामा दिल्यानंतर मनसेचे जिल्हा संघटक उमेश तावडे, तालुकाध्यक्ष सुदाम कराळे, शहराध्यक्ष निशांत मांडविकर, शहर सचिव राजेश सुर्वे, महिला शहर संघटक नंदा पांढरे आदींसह मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून जल्लोष केला. मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी शनिवारी सकाळीच बदलापुरात मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार शनिवारी संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन मोर्चाची घोषणा केली जाणार होती. मात्र तत्पूर्वीच तुषार आपटे याने राजीनामा दिला. हा मनसेचा विजय असल्याचे उमेश तावडे यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in