बदलापूर-कांजूरमार्गच्या मेट्रो १४ ची आखणी सुरू

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मेट्रो मार्गिकेची चर्चा केली होती
बदलापूर-कांजूरमार्गच्या मेट्रो १४ ची आखणी सुरू

मुंबई: मुंबईत मेट्रोचे जाळे विस्तारत आहेत. आता मुंबई महानगर क्षेत्रातही मेट्रोचा विस्तार सुरू आहे. बदलापूर-कांजूरमार्गच्या मेट्रोची १४ ची आखणी सुरू झाली आहे. या मेट्रो रेल्वेमुळे कल्याणपलीकडील लाखो प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

बदलापूर, अंबरनाथ, निळजे, शिळफाटा, महापे, घणसोली आणि ठाण्याच्या खाडीवरून ही मेट्रो मुंबईपर्यंत पोहचणार आहे. या मार्गावर १५ स्टेशन असणार आहेत. त्यातील १३ स्टेशनही उन्नत असतील, तर एक स्टेशन अंडरग्राऊंड, तर एक इंटरचेंज असेल. या मार्गावर भविष्यात आणखी स्टेशन्स उभारण्याची योजना आहे.

यंदाच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मेट्रो मार्गिकेची चर्चा केली होती. एमएमआरडीएने या प्रकल्पाचे तपशीलवार नियोजन करण्यासाठी आयआयटी, बॉम्बेची निवड केली आहे. यात मार्गिकांची आखणी, भविष्यातील प्रवाशांची संख्या, अंदाजित प्रकल्प खर्च, भाड्याचा तपशील, भूसंपादन, आंतरराष्ट्रीय आर्थिक परतावा, प्रकल्पाची व्यवहार्यता आदींचा समावेश आहे. यापूर्वी मिलान मेट्रोने याबाबतचा अहवाल सादर केला होता. यात ३७.९ किमीचा मेट्रो मार्ग खासगी-सरकारी भागीदारीत उभारण्याचा प्रस्ताव होता.

सूत्रांनी सांगितले की, खासगी-सरकारी भागीदारीत (पीपीपी) प्रकल्प उभारण्यापूर्वी आर्थिक व्यवहारता विश्लेषण करणे गरजेचे आहे. पीपीपी मॉडेल स्वीकारल्यास प्रकल्प उभारणी झाल्यानंतर परिचलन व देखभालीचे काम खासगी कंपनीला करावे लागेल. यापूर्वी वर्सोवा-घाटकोपर मेट्रो मार्गिका पीपीपी तत्त्वावर बांधली आहे. ती आर्थिकदृष्ट्या तोट्यात आहे.

मुंबई मेट्रो १४ ही पूर्व-पश्चिमला जोडेल. तसेच मुंबई व एमएमआर क्षेत्रातील मोठ्या लोकसंख्येला जोडण्याचे काम करेल, असे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मेट्रो-४ वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवली, मेट्रो-६ स्वामी समर्थ नगर-जोगेश्वरी, विक्रोळी व कांजूरमार्ग येथे इंटरचेंजेस असतील.

एमएमआरडीएच्या अंतर्गत अभ्यासानुसार, गर्दीच्या वेळेत २०४१ पर्यंत रोज ५४ हजार प्रवासी प्रवास करतील. त्यासाठी बदलापूरला कार डेपोसाठी २० हेक्टरचा भूखंड प्रस्तावित केला आहे. या प्रकल्पात २०२६ पर्यंत अंदाजे ६.३० लाख प्रवासी, २०३१ पर्यंत ६.५० लाख, तर २०४१ पर्यंत ७.५० लाख प्रवासी प्रवास करतील.

या प्रस्तावित मार्गाची वैशिष्ट्ये

लांबी- ३७.९ किमी

उन्नत मार्ग- ८० टक्के

भुयारी मार्ग- १५ टक्के

स्थानके- १५

उन्नत- १३

भुयारी- १

इंटरचेंजेस- १

अंदाजित खर्च- १४८९८ कोटी

logo
marathi.freepressjournal.in