
मुंबई : बदलापूरमधील शाळेतील चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा ठाणे कारागृहात नेत असताना पोलिसांनी एन्काऊंटर केला होता. हे एन्काऊंटर फेक असल्याचा निष्कर्ष काढत या प्रकरणाला ५ पोलीस जबाबदार असल्याचे महत्त्वाचे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. या ५ पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या न्या. रेवती मोहिते-डेरे आणि नीला गोखले यांच्या खंडपीठाने दिले आहेत.
आरोपी अक्षय शिंदेच्या आई-वडिलांनी एन्काऊंटरविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर आता न्यायालायाने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले आहे. अक्षय शिंदेला ठाण्यात आणताना त्याने पोलिसांकडून बंदूक हिसकावून घेतली आणि गोळीबार केला, असा दावा पोलिसांनी केला होता. पण या बंदुकीवर अक्षय शिंदेच्या बोटाचे ठसेच आढळले नाहीत, असे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे याप्रकरणी पाच पोलिसांना दोषी ठरवण्यात आले आहे. या पाचही पोलिसांवर गुन्हा दाखल करून त्यांची चौकशी करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.
ठाणे न्यायदंडाधिकाऱ्यांनी यासंबंधी अहवाल सादर केला होता. मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि नीला गोखले यांनी या अहवालाचे वाचन केले. न्यायालयीन चौकशी समितीच्या या अहवालानुसार, पोलीस कर्मचारी परिस्थिती सहज हाताळू शकले असते आणि बळाचा वापर न्याय्य ठरू शकत नाही. त्यामुळे राज्याने या पोलिसांवर गुन्हा नोंदवून कारवाई करणे आवश्यक आहे, असेही न्यायालयाने म्हटले आहे. दरम्यान, या सुनावणीनंतर विरोधी पक्षाने महायुती सरकार, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. अक्षय शिंदेचा चकमकीत मृत्यू झाल्याचा दावा करणाऱ्या पोलिसांचा खोटेपणा उघड झाला असून पोलिसांची पाठराखण करणाऱ्या राज्य सरकारलाही मोठा झटका बसला आहे.
अक्षय शिंदेला बनावट एन्काऊंटरमध्ये मारण्यात आले. कथित एन्काऊंटरचा विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) तपास व्हावा, अशी विनंती करत अक्षय शिंदेच्या वडिलांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठाने न्यायदंडाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश देत अहवाल मागवला होता. तो अहवाल सोमवारी सादर करण्यात आला. हा अहवाल तपासताना खंडपीठाला पोलीसच अक्षय शिंदेच्या मृत्यूला जबाबदार असल्याचे निदर्शनास आले.
या पोलिसांवर फौजदारी खटला चालणार
ठाणे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे, हेडकॉन्स्टेबल अभिजित मोरे, हरीश तावडे आणि एका पोलीस ड्रायव्हरचा त्यात समावेश असून न्यायालयाच्या आदेशानुसार, आता त्यांच्याविरुद्ध फौजदारी खटला चालणार आहे.
पोलिसांची चौकशी कोण करणार? दोन आठवड्यांत भूमिका स्पष्ट करा!
अक्षय शिंदेला बनावट चकमकीत ठार केले, हे अत्यंत गंभीर आहे. या प्रकाराची सखोल चौकशी झालीच पाहिजे. जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांची अजिबात गय करू नका, असे राज्य सरकारला बजावताना न्यायालयाने जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांविरोधातील गुन्ह्याचा सखोल तपास आणि चौकशी कोणत्या यंत्रणेमार्फत करणार? असा सवाल राज्य सरकारला केला. तसेच याबाबत पुढील दोन आठवड्यांत भूमिका स्पष्ट करण्याची सूचना न्यायालयाने सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांना केली. यानंतर अतिरिक्त सरकारी वकील प्राजक्ता शिंदे यांच्या सहाय्याने महाराष्ट्राचे मुख्य सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांनी राज्य सरकार कायद्यानुसार कारवाई करेल आणि या पोलिसांवर एफआयआर दाखल करेल, अशी माहिती खंडपीठाला दिली.
न्यायालय म्हणते!
न्यायदंडाधिकाऱ्यांनी आपल्या अहवालात जोडलेले सर्व पुरावे एकत्रित विचारात घेतल्यास तसेच न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालाचा विचार करता, अक्षय शिंदेच्या आई-वडिलांनी केलेला आरोप योग्य असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे अक्षय शिंदेच्या मृत्यूला जबाबदार ठरलेल्या पाच पोलीस कर्मचारी-अधिकाऱ्यांविरुद्ध फौजदारी कारवाई झालीच पाहिजे, असे मत न्यायालयाने सोमवारी सुनावणीदरम्यान नोंदवले. न्यायालयाने खुल्या कोर्टात न्यायदंडाधिकाऱ्यांचा अहवाल वाचून दाखवला.
दंडाधिकाऱ्यांच्या अहवालात काय?
अक्षय शिंदेला तळोजा तुरुंगातून पोलीस ठाण्यात नेले जात होते. त्यावेळी अक्षय शिंदेशी झालेल्या झटापटीत पाच पोलिसांनी आपल्या बळाचा केलेला वापर अवास्तव होता. त्यावरून अक्षय शिंदेच्या मृत्यूला संबंधित पाच पोलीस जबाबदार असल्याचे स्पष्ट होते.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, अक्षय शिंदेने पोलिसांवर गोळी झाडली
होती. मात्र बंदुकीवर अक्षय शिंदेच्या बोटांचे ठसेच नाहीत. त्यामुळे पोलिसांनी केलेला दावा प्रथमदर्शनी खोटा ठरतो.
ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला, त्यांनी केलेला वैयक्तिक बचाव शंकास्पद आहे.
माझा मुलगा निर्दोष होता - अक्षयची आई
माझ्या मुलाने गुन्हा केलाच नव्हता, तो निर्दोष होता. माझा मुलगा खरा होता, त्याच्यावर बलात्काराचा आरोप टाकला आणि त्याला पोलिसांनी मारून टाकले. पण आता पोलिसांवरच ठपका ठेवण्यात आल्याने मला आनंद झाला आहे. या प्रकरणानंतर सध्या आमच्या हाताला कामधंदाही नाही. आम्ही सध्या कल्याणमध्येच राहतो, पण हाताला काम नसल्याने आम्ही भीक मागून खात आहोत, असे अक्षय शिंदेच्या आईने सांगितले.
अक्षय शिंदेच्या घरावर जप्तीची नोटीस
बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यांच्या घरावर बँकेने जप्तीची नोटीस लावली आहे. त्याचे वडील अण्णा शिंदे यांनी खाजगी बँकेकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते थकल्यामुळे बँकेने ही जप्तीची नोटीस लावली आहे. अक्षयचे वडील अण्णा शिंदे यांनी जना स्मॉल फायनान्स बँक या बँकेकडून अडीच लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, अत्याचार प्रकरणानंतर त्यांच्या घराची तोडफोड झाल्याने बदलापूर सोडून ते अज्ञात ठिकाणी वास्तव्याला गेले. त्यांना कोणताही कामधंदाही नसल्यामुळे कर्जाचे हप्ते थकले. त्यामुळेच बँकेने त्यांच्या घरावर थेट जप्तीची नोटीस लावली आहे.