महिलेवर अत्याचार करणाऱ्याचा जामीन फेटाळला

कंपनीत वरिष्ठ पदावर कार्यरत असलेल्या महिलेवर अत्याचार करणाऱ्याचा जामीन अर्ज दिंडोशी सत्र न्यायालयाने फेटाळला.
महिलेवर अत्याचार करणाऱ्याचा जामीन फेटाळला
Published on

मुंबई : कंपनीत वरिष्ठ पदावर कार्यरत असलेल्या महिलेवर अत्याचार करणाऱ्याचा जामीन अर्ज दिंडोशी सत्र न्यायालयाने फेटाळला. पीडित महिलेशी प्रेमसंबंध होते. त्यातूनच तिने शरीरसंबंध ठेवण्यास संमती दिली होती, असा आरोपीचा दावा अतिरिक्त सत्र न्यायाधीश नंदकिशोर मोरे यांनी फेटाळून लावला.

कंपनीत वरिष्ठ पदावर असलेल्या महिलेच्या घरी आरोपी अमोल बोर्डे हा मित्रासोबत पार्टीला आला होता. पार्टीच्या दरम्यान अत्याचाराची घटना घडली. याप्रकरणी बोर्डेविरोधात वनराई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. दरम्यान, आरोपीने जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला. अर्जावर अतिरिक्त सत्र न्या. नंदकिशोर मोरे यांच्या समोर सुनावणी झाली. यावेळी आरोपी बोर्डेच्या वतीने पीडित महिला आणि आरोपी यांचे प्रेमसंबंध होते. या प्रेम संबंधातूनच तिने शरीरसंबंध ठेवण्यास संमती दिली होती, असा दावा करण्यात आला. त्याला पीडीत महिलेच्या वतीने अ‍ॅड. प्राची पार्टे आणि अ‍ॅड. रचता धुरू यांनी तीव्र आक्षेप घेतला. प्रथमदर्शनी पुराव्यांवरून आरोपीने जबरदस्ती करून शरीरसंबंध ठेवल्याचे उघड होत असल्याचे स्पष्ट करत, अतिरिक्त सत्र न्या. नंदकिशोर मोरे यांनी बोर्डेला जामीन मंजूर करण्यास नकार दिला. 

logo
marathi.freepressjournal.in