राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यावर हल्ला आरोपीला जामीन

खंडपीठाने लोखंडेला सहा महिन्यांसाठी जामीन मंजूर केला
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यावर हल्ला आरोपीला जामीन

मुंबई : पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष मयूर जाधव यांच्यावर दोन वर्षांपूर्वी झालेल्या हल्ला प्रकरणातील आरोपी प्रतीक लोखंडेला मुंबई हायकोर्टाने सोमवारी जामीन मंजूर केला. आरोपी विरोधातील पुराव्यांमध्ये विसंगती असल्याचे स्पष्ट करत न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती गौरी गोडसे यांच्या खंडपीठाने लोखंडेला २० हजारांच्या रोख रक्कमेच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.

केबल व्यवसायातील पूर्ववैमनस्यातून मयूर जाधव यांच्यावर १८ ऑक्टोबर २०२१ रोजी प्राणघातक हल्ला झाला होता. त्या हल्ल्याप्रकरणी आरोपी प्रतीक लोखंडे व इतर दोघांविरुद्ध वाकड पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न व अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. अटकेनंतर लोखंडे मागील १ वर्षे १० महिने तुरुंगात आहे. त्याने अ‍ॅड. सत्यम निंबाळकर यांच्यामार्फत जामीनासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती गौरी गोडसे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. खंडपीठाने फिर्यादीने तक्रारीत केलेले आरोप हे साक्षीदारांचे जबाब व वैद्यकीय पुराव्यांशी विसंगत आहेत, असे स्पष्ट करत खंडपीठाने लोखंडेला सहा महिन्यांसाठी जामीन मंजूर केला.

logo
marathi.freepressjournal.in