रस्ते समतोल करा, अवजड वाहनांना बंदी घाला गणेशोत्सव समन्वय समितीची सूचना

आगमन मिरवणुकीत कोणतेही निर्विघ्न येऊ नये, याकडे समन्वय समितीने प्रशासनाचे लक्ष वेधले
रस्ते समतोल करा, अवजड वाहनांना बंदी घाला गणेशोत्सव समन्वय समितीची सूचना

मुंबई : लाडक्या गणरायाच्या आगमनाला आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले असून ठिकठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांत बाप्पाचे आगमन २ आणि ३ सप्टेंबर रोजी होणार आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांतील गणेशमूर्ती २५ फुटांपेक्षा उंच असल्याने खड्डे बुजवल्यानंतर असमतोल झालेले रस्ते समतोल करण्यात यावे, भायखळ्यापासून सुरू होणाऱ्या उड्डाणपुलावरून अवजड वाहनांना बंदी घालण्यात यावी, अशा विविध सूचना गणेशोत्सव समन्वय समितीने पोलिसांसोबतच्या बैठकीत केल्याचे गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहिबावकर यांनी सांगितले.

२० दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवाची लगबग सुरू झाली आहे. येत्या २ ते ३ सप्टेंबर तसेच त्यानंतरच्या शनिवार व रविवार या सुट्टीच्या दिवशी बहुतांशी गणेशोत्सव मंडळांच्या मंडपात गणरायाचे आगमन होणार आहे. आगमनाच्या वेळी कोणतेही व्यत्यय, निर्विघ्न येऊ नये, यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस, गणेश मंडळांचे पदाधिकारी आदींची बैठक पार पडली. यात आगमन मार्गावरील खड्डे बुजवा, झाडांच्या फांद्यांची छाटणी, गर्दीचे नियोजन, वाहतुकीतील अडचणी दूर करा, उड्डाणपुलांवरून अवजड वाहनांवर बंदी आणा, आदी पर्यायांबाबत बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने सूचना केल्या, अशी माहिती दहिबावकर यांनी दिली.

गणेशोत्सव जवळ आल्याने लालबाग, परळ व त्याच्या आसपास असलेल्या मूर्तिकाराच्या कारखान्यातून गणेशमूर्तींचे आगमन होणार असून या भागात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होते. यावर नियोजन करण्यासाठी पोलीस व इतर यंत्रणांसोबत मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत आगमनमार्गावर खड्डे बुजवताना रस्त्यांची वाढलेली उंची, बहुतांशी गणेशमूर्तींची उंची २५ फुटांपेक्षा अधिक असल्याने आगमन मिरवणुकीत होणाऱ्या गर्दीचे नियोजन होणे आवश्यक आहे. याशिवाय खड्डेमुक्त रस्ते, रस्त्यांच्या बाजूला खाली आलेल्या फांद्यांची छाटणी, उड्डाणपुलावरून अवजड वाहनांवर बंदी घालणे, वाहतूककोंडी होऊ नये, आदी सूचना समितीने केल्या. आगमन मिरवणुकीत कोणतेही निर्विघ्न येऊ नये, याकडे समन्वय समितीने प्रशासनाचे लक्ष वेधले.

या सूचनांकडे लक्ष वेधले!

येत्या शनिवार, रविवारपासून बहुतांशी मंडळाच्या मंडपात गणपतीबाप्पाचे आगमन होण्यास सुरुवात होणार आहे. वाहतूक यंत्रणेवर परिणाम होऊ नये, यासाठी या दिवशी दोन्ही दिशेने जाणारी वाहने लालबाग राजा सिग्नलपासून आयटीसी हॉटेलपर्यंत एकच अशोका टॉवरच्या बाजूने चालविण्यात यावीत व श्रॉफ बिल्डिंग ते तेजुकाया, भारतमाता, परळ वर्कशॉप हा मार्ग फक्त गणेशमूर्तीच्या आगमनासाठी रिकामी ठेवण्यात यावा, गर्दी एकाच मार्गिकेवर आणि वाहतूककोंडी होणार नाही याची दक्षता घ्यावी, भायखळा येथून सुरू होणाऱ्या उड्डाणपुलावरून बस अथवा अवजड वाहनांना प्रवासासाठी परवानगी देऊ नये, त्यांना रे रोड, कॉटन ग्रीन, चार रस्ता मार्गे वळविण्यात यावे, तसेच रेडिओ, मीडिया, ट्वीटरच्या माध्यमातून लोकांना सांगण्यात यावे, कन्स्ट्रक्शनच्या गाड्यांना सकाळी ९ ते सायंकाळी ८ पर्यंत परवानगी देऊ नये, आदी सूचना समितीने केल्या आहेत.

logo
marathi.freepressjournal.in