सृजनशील विद्यार्थ्यांनी कुंचल्यांनी भरले ‘माझी मुंबई’चे रंग: बाळासाहेब ठाकरे बालचित्रकला स्पर्धा संपन्न; ८८ हजार विद्यार्थ्यांनी सादर केले कलागुण

विद्यार्थ्यांमधील सृजनशीलता, कलागुणांना वाव देण्यासह त्यांच्या कल्पनांना आकार देण्यासाठी शिक्षण विभाग सतत प्रयत्नशील असतो.
सृजनशील विद्यार्थ्यांनी कुंचल्यांनी भरले ‘माझी मुंबई’चे रंग:  बाळासाहेब ठाकरे बालचित्रकला स्पर्धा संपन्न; ८८ हजार विद्यार्थ्यांनी सादर केले कलागुण

मुंबई : पालिकेच्या शिक्षण विभागातर्फे 'माननीय महापौर आयोजित जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे बालचित्रकला स्पर्धेमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या मिळून सुमारे ८८ हजार ८०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. मुंबईतील ४८ उद्याने व मैदानांवर रविवारी सकाळी ८ ते ११ या वेळेत एकाचवेळी पार पडलेल्या या स्पर्धेसाठी 'माझी मुंबई' ही संकल्पना निवडण्यात आली होती. दरम्यान, दहिसर (पूर्व) येथील आजी-आजोबा उद्यानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन चित्रकला स्पर्धेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.

विद्यार्थ्यांमधील सृजनशीलता, कलागुणांना वाव देण्यासह त्यांच्या कल्पनांना आकार देण्यासाठी शिक्षण विभाग सतत प्रयत्नशील असतो. त्याच पार्श्वभूमीवर प्रतिवर्षी 'महापौर आयोजित जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे बालचित्रकला स्पर्धा' आयोजित करण्यात येते. स्पर्धेचे यंदा १५ वे वर्ष होते. पालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इक्बालसिंह चहल, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी आमदार प्रकाश सुर्वे, पालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इक्बालसिंह चहल, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे तसेच अन्य मान्यवरांनी दहिसर येथील आजी-आजोबा उद्यानास भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

चित्र काढण्यासाठी लागणाऱ्या पेन्सिल, पेपर, रंग, मार्कर, खोडरबर हे साहित्य घेऊन सकाळपासूनच मुंबईतील उद्यान आणि मैदानांमध्ये चिमुकल्यांची वर्दळ सुरू होती. त्यांना सोडण्यासाठी आलेल्या पालकांची मोठी गर्दी झाली होती. सकाळी ८ वाजता मुलांना चित्र काढण्यासाठी विषय देण्यात आले. तेव्हापासून ११ वाजेपर्यंत विद्यार्थी चित्र काढण्यात मग्न होते. स्पर्धेत सहभागी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी अतिशय सुरेख अशी चित्रे रेखाटली.

स्वप्नातील ‘माझी मुंबई’ उभी केली

यंदाच्या चित्रकला स्पर्धेसाठी 'माझी मुंबई' ही संकल्पना निवडण्यात आली होती. स्पर्धेत सहभागी सर्वच गटातील विद्यार्थ्यांनी आपल्या स्वप्नातील मुंबई कशी असेल, तिच्या अवतीभोवतीचा परिसर कसा असावा, मुंबईभोवती असलेला निळाशार समुद्र कसा दिसतो, उंच उंच इमारतींचे चित्र भविष्यात कसे असेल, मुंबईचे स्वच्छ रस्ते अशा अनेक संकल्पनांना चित्ररूपाने साकारले. तसेच शीला रहेजा उद्यान येथे आमदार सुनील प्रभू, माजी उपमहापौर सुहास वाडकर, तुळशिराम शिंदे तसेच अन्य मान्यवरांनी, तर कमलाकर पंत वालावलकर उद्यान येथे आमदार भारती लव्हेकर यांनी भेट दिली. एफ दक्षिण विभागातील मंचेरजी जोशी पाच उद्यान (फाइव्ह गार्डन) तसेच, कामगार मैदान आणि भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालय येथे उपायुक्त (शिक्षण) चंदा जाधव, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजेश कंकाळ, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजू तडवी यांनी भेट दिली, तर सहआयुक्त (करनिर्धारण व संकलन) सुनील धामणे, एन विभागाचे सहाय्यक आयुक्त गजानन बेल्लाळे यांनी विविध ठिकाणी भेट देऊन विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. उपशिक्षणाधिकारी सुजाता खरे, कला विभागाचे प्राचार्य दिनकर पवार आदींसह सहकारी कला निदेशक, केंद्रप्रमुख शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी स्पर्धेचे संयोजन केले

२५ हजार, सन्मानचिन्ह देऊन सत्कार!

स्पर्धेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला २५ हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे, तर द्वितीय येणाऱ्या विद्यार्थ्याला २० हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र तसेच तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्याला १५ हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे. उत्तेजनार्थ ५ हजार रुपयांचे पारितोषिक, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र १० विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.

उत्तम चित्रांना प्रत्येकी ५०० रुपयांचे बक्षीस!

पालिकेच्या २५ प्रशासकीय विभागांमधील प्रत्येक गटातील ५ याप्रमाणे जवळपास ५०० उत्तम चित्रांना प्रत्येकी ५०० रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक स्पर्धकाला सहभाग घेतल्याचे प्रशस्तीपत्र स्पर्धा संपल्यानंतर लगेचच देण्यात आले. या स्पर्धेचा निकाल सोमवार, २२ जानेवारी २०२४ रोजी जाहीर करण्यात येणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in