बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न मिळावे! राज ठाकरे यांनी व्यक्त केली अपेक्षा

माजी पंतप्रधान स्व. पी. व्ही. नरसिंह राव, स्व. चौधरी चरण सिंह आणि भारतीय हरित क्रांतीचे जनक एस. स्वामीनाथन यांना भारतरत्न सन्मान घोषित करण्यात आला.
बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न मिळावे! राज ठाकरे यांनी व्यक्त केली अपेक्षा

प्रतिनिधी/मुंबई : देशातील प्रख्यात व्यंगचित्रकार आणि देशभरातील तमाम हिंदूंची अस्मिता जागृत करणाऱ्या हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे या अद्वितीय नेत्याला भारतरत्न हा सन्मान मिळायलाच हवा, अशी अपेक्षा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली. बाळासाहेबांना भारतरत्न मिळाला तर त्यांच्या विचारांचा वारसा ज्यांच्याकडे आलाय, अशा माझ्यासारख्या अनेकांसाठी तो अत्यानंदाचा क्षण असेल, असेही राज यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव, चौधरी चरण सिंह आणि भारतीय हरित क्रांतीचे जनक एस.स्वामीनाथन यांना भारतरत्न सन्मान घोषित केला. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी एक्स या समाजमाध्यमावर पोस्ट करत बाळासाहेब ठाकरे यांनाही भारतरत्न पुरस्काराने सन्मान करण्याची अपेक्षा बोलून दाखवली आहे.

माजी पंतप्रधान स्व. पी. व्ही. नरसिंह राव, स्व. चौधरी चरण सिंह आणि भारतीय हरित क्रांतीचे जनक एस. स्वामीनाथन यांना भारतरत्न सन्मान घोषित करण्यात आला. या यादीतले एस. स्वामीनाथन यांचे अवघ्या काही महिन्यांपूर्वी निधन झाले. इतकी अफाट कामगिरी करणाऱ्या शास्त्रज्ञाला त्यांच्या हयातीत हा बहुमान मिळायला हवा होता. असो. बाकी पी. व्ही, नरसिंह राव आणि चौधरी चरण सिंह यांना आणि काही वर्षांपूर्वी प्रणब मुखर्जींना भारतरत्न सन्मान घोषित करून, केंद्रातील भारतीय जनता पक्ष प्रणित सरकारने राजकीय औदार्य दाखवलंच आहे. तर मग हेच औदार्य त्यांनी हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांना देखील भारतरत्न घोषित करून दाखवायलाच हवे, असे राज म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in