बाळासाहेबांनी स्टॅलिनची अय्यरसारखी हालत केली असती ; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात येईल
बाळासाहेबांनी स्टॅलिनची अय्यरसारखी हालत केली असती ; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
Published on

मुंबई : स्टॅलिन हे हिंदूविरोधी आहेत. सनातन धर्म पौराणिक आहे. त्याला इतिहास आहे. असे कितीही स्टॅलिन आले तरी सनातन धर्म नष्ट करू शकत नाही. इंडिया अलायन्स हिंदूंच्या विरोधात आहे. आता त्यांचे चेहरे उघड होत आहेत. बाळासाहेब ठाकरे असते तर जशी मणिशंकर अय्यरची हालत केली तशी स्टॅलिनची झाली असती, पण दुर्दैव आहे की त्यांचे चिरंजीव, माजी मुख्यमंत्री हे मूग गिळून गप्प आहेत. हेच त्यांचे हिंदुत्व आहे. हिंदुत्वाचा मुखवटा पांघरून हिंदुत्ववादी होता येत नाही. हिंमत असेल तर स्टॅलिनची गत अय्यरसारखी केली पाहिजे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. त्यांची निष्ठा राज्यातील जनतेने पाहिली आहे. सत्तेसाठी, मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीसाठी निष्ठा विकणाऱ्यांनी लोकांना निष्ठेचे धडे देऊ नयेत, असा टोलाही त्यांनी लगावला.

मराठा आरक्षणावर सरकार गंभीर आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना जे आरक्षण दिले होते तेव्हा मी त्यांच्यासोबत होतो. उच्च न्यायालयाने त्याला मान्यता दिली होती, पण महाविकास आघाडी सरकारच्या काळात दुर्दैवाने सर्वोच्च न्यायालयात ते आरक्षण टिकले नाही. त्यांच्या नाकर्तेपणामुळेच ही वेळ आली, आता मात्र ते यावर राजकारण करत आहेत अशी टीकाही मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. मराठा आरक्षणावर सरकार गंभीर आहे. सर्वोच्च न्यायालयाने जे मुद्दे काढले आहेत त्यावर काम करून मराठा समाज हा सामाजिक तसेच शैक्षणिक पातळीवर मागास आहे हे सिद्ध करावे लागेल. इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात येईल, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.

logo
marathi.freepressjournal.in