
प्रत्येक नेत्याला 'मातोश्री'वर येण्यासाठी भाग पाडणारा बाळासाहेबांचा आदरयुक्त दबदबा उद्धव ठाकरेंनी रसातळाला पोहोचवला आहे. पक्ष, संघटना किंवा कार्यकर्त्यांसाठी कधीही घराबाहेर न पडलेले उद्धव ठाकरे आता राहुल गांधींच्या पदयात्रेसाठी पायघड्या घालण्यासाठी घराबाहेर पडणार हा उद्धव ठाकरे यांच्यावर काळाने उगवलेला सूड आहे, अशी टीका प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे निमंत्रण स्वीकारले असून, ते यात्रेत सहभागी होणार आहेत. या निर्णयावरून भाजपने ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ‘मुंह मे राम, बगल मे राहुल’ ही म्हण उद्धव ठाकरे यांच्यासाठीच शब्दशः तयार झाली असावी, असा टोला उपाध्ये यांनी लगावला.
यापूर्वी भाजपसोबत युती असताना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे कधी रस्त्यावर उतरले नाहीत. लालकृष्ण अडवाणी-मुरली मनोहर जोशींच्या रथयात्रांत तर उद्धव ठाकरे फिरकले देखील नाहीत. हात उंचावून जाहीर सभांमध्ये हिंदुत्वाच्या पोकळ गर्जना करणारे उद्धव ठाकरे बाबरी प्रकरणाच्या वेळी शिवसैनिकांना रस्त्यावर उतरवून घरात टीव्ही बघत होते, याकडे उपाध्ये यांनी लक्ष वेधले.