
मुंबई : वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने धुळीच्या माध्यमातून होणाऱ्या प्रदूषणावर आळा बसवण्यासाठी बांधकाम तसेच खोदकामांवर बंदी आणली होती. मात्र, मुंबईतील काही भाग सोडले तर अन्य ठिकाणाच्या हवेतील प्रदूषणाची पातळी सुधारत आहे. त्यामुळे पालिकेने ३० डिसेंबर रोजी लागू केलेली खोदकामावरील बंदी उठवण्याचा विचार केला आहे. दरम्यान, ज्या ठिकाणाची हवेची गुणवत्ता अद्याप सुधारलेली नाही त्याठिकाणी खोदकामाचे निर्बंध कायम ठेवण्यात येणार आहे. अशी माहिती पालिका अधिकाऱ्यानी दिली.
मुंबईमध्ये हवेच्या पातळीने तळ गाठल्यावर महापालिकेच्या वतीने विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. त्यातीलच एक भाग म्हणजे रस्त्यावरील खोदकाम. खोदकामातून निर्माण होणाऱ्या धुळीमुळे आणि अन्य प्रदूषकांमुळे प्रदूषणात वाढ होत असल्याचे पालिकेच्या निदर्शनात आले. यावर उपाय म्हणून पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी मागील दोन आठवड्यांपासून शहरातील खोदकामाला परवानगी न देण्याचे निर्देश प्रशासकीय विभागांचे सहायक आयुक्त, रस्ते व वाहतूक विभागाचे उप प्रमुख अभियंता यांना दिले होते. यानुसार शहरातील खोदकाम बऱ्यापैकी बंद होते. तसेच बोरिवली आणि भायखळा या भागातील बांधकामामुळे प्रदूषणात वाढ होत असल्याचे निदर्शनात आल्यावर पालिकेने येथे सुरू असलेल्या बांधकामावर बंदी आणली होती. तथापि, पालिका राबवत असलेल्या उपाययोजनांमुळे हवेची पातळीत काही अंशी सुधारणा झाली आहे.
महानगरपालिका क्षेत्रातील प्रदूषित असलेल्या भागात प्रदूषण कमी झाल्याचे निदर्शनात आल्यास या ठिकाणी लवकरच खोदकामास परवानग्या देण्यात येतील. मात्र, खराब हवेची गुणवत्ता असलेल्या भागात नवीन परवानगी दिल्या जाणार नाही, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.
२७१ बांधकाम व्यावसायिकांकडून नियमपालन
१ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर २०२४ दरम्यान ४६२ बांधकाम प्रकल्पांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आले होते. त्यांना पालिकेच्या वतीने काम थांबवण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. यापैकी २७१ बांधकामांत व्यावसायिकांनी धुळीपासून होणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी लागू करण्यात आलेल्या नियमांचे पालन केल्याचे आढळून आल्यावर त्यांच्यावरील कारवाई थांबवण्यात आली, तर मुंबईतील प्रदूषित असलेल्या कुलाबा-नेव्ही नगर आणि गोवंडी-शिवाजी नगर भागांवर पालिकेचे विशेष लक्ष असून या ठिकाणावरील प्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी पालिका आग्रही असल्याचे पालिका अधिकाऱ्याने सांगितले.