पीओपीच्या मूर्तींवर टप्याटप्याने घालणार बंदी , पालिका प्रशासनाचे आवाहन

मुर्तीकारही सहा महिने आधीच गणेश मूर्ती तयार करण्यास सुरुवात करतात.
 पीओपीच्या मूर्तींवर टप्याटप्याने घालणार बंदी , पालिका प्रशासनाचे आवाहन

शाडूच्या मातीच्या मूर्ती तयार करण्यासाठी माती मिळणे कठीण आहे. तरीही पर्यावरण व समुद्री जीवाचा विचार करत शाडूच्या मातीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करा, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती टाळा, असे आवाहन पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी गणेश भक्तांना केले आहे. पीओपीच्या गणेशमुर्तींमुळे निसर्गाला होणारा धोका लक्षात घेता समुद्रात, जलाशयात पीओपी गणेश मूर्ती विसर्जन करण्यास बंदी असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, पीओपीच्या मूर्तींवर लगेच बंदी घालणे शक्य नसून टप्याटप्याने यावर बंदी घालण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

देशभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. परंतु मुंबईत कुठल्याही सणाचा आनंदचं वेगळाच असतो. गणेशोत्सव म्हणजे मुंबईत महिनाभर आधीच तयारी सुरु होते. मंडप, सजावट अशी लगबग पहावयास मिळते. मुर्तीकारही सहा महिने आधीच गणेश मूर्ती तयार करण्यास सुरुवात करतात. त्यामुळे पीओपीच्या मूर्तींवर अचानक बंदी घालणे योग्य नाही. गणेश भक्तांमध्ये जनजागृती करत टप्याटप्याने पीओपीच्या मुर्तींचा वापर करणे बंद होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यंदा पीओपीच्या गणेशमुर्तीची प्रतिष्ठापना केली तरी पालिकेनेही तयार केलेल्या कृत्रिम तलावात विसर्जन करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. मुंबईत १२ हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात व दोन लाख घरगुती मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात येते. घरगुती मूर्तींची उंची २ फुटांपर्यंत असाव्यात, अशी सूचना गणेश भक्तांना केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in