मुंबई : लहान मुले भारताचे उद्याचे भविष्य आहे. मात्र मुलांमध्ये व्यसनाचे प्रमाण वाढत असून, मुलांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शाळा काॅलेजच्या ५०० मीटर परिसराच्या आत नशा आणणाऱ्या अप्रमाणित एनर्जी शीतपेयावर बंदी घालण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येणार असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मारावबाबा अत्राम यांनी विधान परिषदेत दिली.
राज्यातील कॅफेनचे अतिरिक्त प्रमाण असलेल्या एनर्जी ड्रिंक्सच्या विक्रीवर बंदी आणण्याबाबत विधान परिषदेत सत्यजीत तांबे यांनी प्रश्न विचारला होता. राज्यातील मुंबईसह नाशिक तसेच शहरी आणि ग्रामीण भागात एनर्जी पेयांच्या (ड्रिंक्सच्या) नावाखाली कॅफेनचे अतिरिक्त प्रमाण असलेली एनर्जी ड्रिंक्स बाजारात विक्रीला आहेत.
खुल्या बाजारात विकल्या जाणाऱ्या या ड्रिंक्समध्ये २५० मिलीच्या बाटलीत ७४ मिली ग्रॅमपेक्षा जास्त कॅफेन असल्यामुळे नशा येते. त्यामुळे मेंदू, किडनी, मज्जारज्जू यावर परिणाम होऊन अस्वस्थता, निद्रानाश, प्रजनन समस्या, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, चिडचिडेपणा अशा शारीरिक आजारही निर्माण होत आहे.
शाळा आणि कॉलेजमधील मुलांना या तथाकथित एनर्जी ड्रिंक्सच्या पाठीमागे लागले आहेत. हा धोका लक्षात घेऊन शाळा आणि कॉलेज परिसरात या एनर्जी ड्रिंक्सवर बंदी घालावी. त्याचबरोबत त्या संदर्भातील आक्षेपार्ह जाहिरातींवर कारवाई करण्याची मागणी सत्यजीत तांबे यांनी केली होती.