मुंबईत पुन्हा अग्नितांडव; वांद्रे येथील लिंक स्क्वेअर मॉलमध्ये आग; आगीत मोठ्या प्रमाणात वित्तहानी

वांद्रे (पश्चिम) येथील तळघर अधिक तीन मजली लिंक स्क्वेअर मॉलमधील क्रोमा शोरूममध्ये मंगळवारी साडेचारच्या सुमारास अचानकपणे आग लागली.
मुंबईत पुन्हा अग्नितांडव; वांद्रे येथील लिंक स्क्वेअर मॉलमध्ये आग; आगीत मोठ्या प्रमाणात वित्तहानी
एक्स @rais_shk
Published on

मुंबई : वांद्रे (पश्चिम) येथील तळघर अधिक तीन मजली लिंक स्क्वेअर मॉलमधील क्रोमा शोरूममध्ये मंगळवारी साडेचारच्या सुमारास अचानकपणे आग लागली. या आगीत क्रोमा शोरूम जळून खाक झाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. आगीवर दहा तासांनी सर्व बाजूंनी नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले.

वांद्रे (पश्चिम) येथील प्रसिद्ध लिंक स्क्वेअर मॉलमध्ये तळघर भागात असलेल्या क्रोमा शोरूममध्ये मंगळवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या शोरूममध्ये मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक वस्तू असल्याने ही आग काही क्षणातच भडकली. आगीची वर्दी मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझविण्याचे काम हाती घेतले.

या घटनेची अधिक चौकशी पोलिस, अग्निशमन अधिकारी आदी यंत्रणेकडून केली जात असल्याचे सांगण्यात आले.

…आणि आग वाढत गेली

पहाटे ४.१७ वाजता आग स्तर - १ ची होती. मात्र अवघ्या ११ मिनिटांत आग आणखी भडकल्याने आगीचा स्तर - २ झाल्याचे अग्निशमन दलाने जाहीर केले. त्यानंतर आणखी २१ मिनिटात आगीची दाहकता वाढली. सकाळी ६.२५ वाजता आगीचा स्तर - ४ झाला. आगीची भीषणता लक्षात घेता आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाने १३ फायर इंजिन आणि ९ जंबो वॉटर टँकर पाचारण करत आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न केले. सकाळी ७.५० वाजता 'एनडीआरएफ'च्या चमूला मदतीसाठी घटनास्थळी पाचारण करण्यात आले. त्यानंतर आग विझविण्याच्या कार्यवाहीला आणखी वेग आला. सायकाळी ५.२० सुमारास आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले अग्निशमन दलाला यश आहे.https://x.com/ANI/status/1917124588099559732

झिशान सिद्दीकी यांचे आरोप

अग्निशमन दलाच्या हलगर्जीपणामुळे आग भीषण झाल्याचा आरोप अजित पवार राष्ट्रवादी गटाचे नेते झिशान सिद्दीकी यांनी केला आहे. सकाळी ४ वाजल्यापासून मी आणि इतर नागरिक या ठिकाणी होतो. क्रोमाच्या बेसमेंटमध्ये सुरुवातीला लहानसा स्पार्क झाला. त्यानंतर आम्ही अग्निशमन दलाला ‘अजून पाणी मागवा’ अशी विनंती केली. मात्र त्यांच्याकडे आग विझवण्यासाठी लागणारे साहित्य उपलब्ध नव्हते. उपलब्ध असलेले साहित्य त्यांना वापरता येत नव्हते. आग लागल्यानंतर मॉलचा मागचा भाग विळख्यात आला नव्हता. अग्निशमन दलाला तिथे पाणी पोहोचवण्याची विनंती केली. त्यांना विनंती करून तिथे पाणी पोहोचवले. मात्र त्यांना ते साहित्य वापरता येत नव्हते, असा आरोप झिशान सिद्दीकी यांनी केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in