

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी केली आहे. तरीही सगळ्यांचे लक्ष लागले आहे ते मातोश्रीकडे. वांद्रे (पूर्व) प्रभाग क्रमांक ९४ हा कला नगर परिसर. याच ठिकाणी उद्धव ठाकरे यांचे मातोश्री निवासस्थान आहे. प्रभाग क्रमांक ९४ मध्ये चार महिला उमेदवार रिंगणात असून ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रज्ञा भूतकर या उमेदवार आहेत. त्यामुळे मातोश्रीच्या अंगणात ठाकरेंसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची लढत आहे.
२०१७ नंतर ९ वर्षांनंतर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक पार पडत असून उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीचा गड राखणे उद्धव ठाकरेंसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. मातोश्रीचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रभाग क्रमांक ९४ मध्ये यंदाच्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत अत्यंत अटीतटीची लढत रंगली आहे.
ठाकरे कुटुंबाची प्रतिष्ठा पणाला लागली असून, या प्रभागात प्रमुख पक्षांच्या महिला उमेदवारांनी प्रचाराचा जोर वाढवला आहे. प्रचाराच्या रणांगणात महिला उमेदवार आमनेसामने उभ्या ठाकल्याने मतदारांचे लक्ष या लढतीकडे लागले आहे.
वांद्रे (पूर्व) विधानसभा क्षेत्रातील प्रभाग क्रमांक ९४ मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या प्रज्ञा भूतकर, शिवसेना (शिंदे गट) च्या पल्लवी सरमळकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या रश्मी मालुसरे आणि काँग्रेसच्या ॲड. सुप्रिया पाठक यांच्यात मुख्य लढत होत आहे. नऊ वर्षांनी ही महानगरपालिका निवडणूक होत असल्याने सर्वच उमेदवारांसाठी ही अस्तित्वाची लढाई आहे.
२०१७ मध्ये मनसेतर्फे निवडणूक लढवलेल्या रश्मी मालुसरे यांना पराभव पत्करावा लागला होता. तर स्थानिक उमेदवार असलेल्या प्रज्ञा भूतकर यांनी २०१७ च्या निवडणुकीत मातोश्रीचा बालेकिल्ला कायम राखला होता. मात्र यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय पक्षाच्या तीन महिला उमेदवारांचे आव्हान त्यांच्या समोर असून मातोश्रीचा गड राखणे हे मोठे आव्हान आहे. ठाकरे सेनेचा सगळा जोर, सगळी मदार ही त्यांच्या पारंपरिक मतदारांवर असणार आहे. मात्र, याच पारंपरिक मतदारांनी भाजप आणि शिंदे सेनेला भरभरून मतदान केल्यामुळे गेल्या विधानसभा निवडणुकीत बाजी महायुतीने मारली होती.
अशी होणार लढत...
प्रज्ञा भूतकर - शिवसेना (उबाठा)
पल्लवी सरमळकर - शिवसेना (शिंदे गट)
ॲड. सुप्रिया पाठक - काँग्रेस
रश्मी मालुसरे - राष्ट्रवादी काँग्रेस
२०१७ चा निकाल
प्रज्ञा भूतकर (शिवसेना-उबाठा) - ८,६१७
रश्मी मालुसरे (मनसे) - ६,९४२
स्नेहल जाजू (काँग्रेस) - ५,५३५
सोनाली तायशेटे (भाजप) - ५,२६९
प्रभागातील मतदार
एकूण मतदार : ५४,०००
दुबार मतदार : ७,०००