वांद्रे किल्ल्याला नवा साज, पर्यटनाला चालना देण्यासाठी मुंबईच्या सौंदर्यात भर ; पालिका करणार ११ कोटी रुपये खर्च

मुंबईतील वरळी, माहिम, वांद्रे, सायन व शिवडी किल्ल्यांची डागडुजी, दुरुस्ती अशी कामे मुंबई महापालिकेच्या माध्यमातून करण्यात येणार
वांद्रे किल्ल्याला नवा साज, पर्यटनाला चालना देण्यासाठी मुंबईच्या सौंदर्यात भर ; पालिका करणार ११ कोटी रुपये खर्च

मुंबईतील गडकिल्ल्यांचे संवर्धन करत तरुण पिढीला गडकिल्ल्यांचा इतिहास कळावा यासाठी मुंबईतील किल्ल्यांचा कायापालट करण्यात येत आहे. वांद्रे किल्ल्याला नवा साज दिला जात असून, लेझर शो आकर्षक विद्युत रोषणाई, पर्यटकांसाठी आसन व्यवस्था, शौचालय, अशा विविध सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. यासाठी मुंबई महापालिका तब्बल ११ कोटी रुपये खर्चणार आहे.

मुंबईतील वरळी, माहिम, वांद्रे, सायन व शिवडी किल्ल्यांची डागडुजी, दुरुस्ती अशी कामे मुंबई महापालिकेच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत. वांद्रे किल्ला हा पोर्तुगीजांनी १६४० मध्ये माहीम उपसागर, अरबी समुद्र आणि माहीमच्या दक्षिणेकडील बेटाकडे लक्ष देणारा टेहळणी बुरूज म्हणून बांधला होता. १६६१ मध्ये पोर्तुगीजांनी वांद्रे दक्षिणेकडील सात बेटे इंग्रजांच्या ताब्यात दिल्याने किल्ल्याचे सामरिक मूल्य वाढले; मात्र सद्यस्थितीत किल्ल्यांची डागडुजी व दुरुस्ती करणे गरजेचे झाले आहे. त्यामुळे वांद्रे किल्ल्यावर पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विविध सोयीसुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

शशांक मेहंदळे यांची नेमणूक

वांद्रे किल्ल्याचा जीर्णोध्दार करण्यासाठी सल्लागार म्हणून शशांक मेहंदळे यांची नेमणूक करण्यात आल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

'या' कामांचा समावेश

पाच वर्षे कालावधीकरिता वांद्रे किल्ल्याच्या पुढे लेझर शो व लँडस्केप तसेच प्रोमेनेड लाइटिंग, अशी कामे होणार असून पुढील पाच वर्षांसाठी कंत्राट देण्यात येणार आहे.

वांद्रे किल्ल्याचा इतिहास

पोर्तुगीजांनी १५३४ मध्ये गुजरातच्या बहादूर शाहचा पराभव करून या भागात आपला तळ स्थापन केला होता, त्यांनी पश्चिम भारतीय किनारपट्टीवर अनेक सागरी किल्ले बांधले. बांद्रा किल्ला हा असाच एक सामरिकदृष्ट्या स्थित किल्ला होता, ज्याच्या दक्षिणेला माहीमची खाडी, पश्चिमेला अरबी समुद्र, दक्षिणेला वरळीची बेटे आणि दक्षिण पश्चिमेला माहीम शहर दिसते.

म्हणून किल्ल्याला 'वांद्रे' नाव

मुंबई बंदरात जाणाऱ्या उत्तरेकडील सागरी मार्गाचे रक्षणही या किल्ल्यातून केले जात असे. पोर्तुगीज राजवटीत, हा किल्ला सात तोफांनी आणि इतर लहान तोफा संरक्षण म्हणून सज्ज होते. परिसरातील गोड्या पाण्याच्या झऱ्याने जाणाऱ्या जहाजांना पिण्यायोग्य पाणी पुरवले, त्यामुळे किल्ल्याचे नाव वांद्रे किल्ला असे पडले.

पाच किल्ले पर्यटकांचे आकर्षण ठरणार

ऐतिहासिक महत्त्व असलेले मुंबईतील शेकडो वर्षे जुने किल्ले लवकरच पर्यटकांचे आकर्षण ठरणार आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि मुंबईच्या सौंदर्यात भर पडावी यासाठी मुंबईतील पाच किल्ल्यांचे संवर्धन करत पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यात येणार आहे. मुंबईतील माहिम, वरळी, वांद्रे, सायन, शिवडी या पाच किल्ल्यांचा कायापालट होणार आहे, पालिकेच्या नियोजन विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबई बेटावर एकूण ११ किल्ले बांधण्यात आले. या किल्ल्यांची दुरवस्था झाली आहे. वांद्रे, माहीम, वरळी, काळा किल्ला, रिवा सायन टेकडी, शीव, शिवडी, माझगाव, डोंगरी, फोर्ट सेंट जॉर्ज आणि बॉम्बे फोर्ट. यातील पाच किल्ल्यांचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. पर्यटनाच्या दृष्टीने हा विकास करण्याचे पालिका प्रशासनाचे प्रयत्न सुरु असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

किल्ल्याच्या परिसराची, डागडूजी, स्वच्छता, किल्ल्याचा परिसर सुशोभित करण्यात येणार आहे. पर्यटकांसाठी सर्व किल्ल्यांवर लेझर शो ची व्यवस्था करण्यात येणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in