
मुंबई : वांद्रे पश्चिम येथील वांद्रे किल्ल्याजवळ होणारी वाहतूककोंडी फुटणार आहे. वांद्रे किल्ल्याजवळील वाहतूककोंडी फोडण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतू (वर्सोवा-वांद्रे सागरी सेतू) प्रकल्पात अतिरिक्त जोडरस्ता करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्त्वतः मान्यता दिली आहे. तसेच अतिरिक्त जोडरस्ता करण्यासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमएमआरडीएला दिले.
सोमवारी सह्याद्री अतिथीगृहात वांद्रे (पश्चिम) विधानसभा क्षेत्रातील प्रश्नांसंदर्भात आढावा बैठक पार पडली. वांद्रे स्टेशनच्या पश्चिमेकडील महाराष्ट्र नगर व शास्त्रीनगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासाठी प्रस्तावित विकास नियोजन रस्त्याच्या कामासाठी बेस्ट बस डेपोची जागा हस्तांतरण करण्याबाबत तातडीने मार्ग काढण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले. तसेच सांताक्रुझ (पश्चिम) येथील दौलत नगर येथील बेस्टच्या जुन्या वसाहतीच्या पुनर्विकासाबाबत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतली.
म्हाडाच्या संक्रमण शिबिरांचा पुनर्विकास आणि वांद्रे पश्चिम येथील म्हाडाच्या प्लॉट नं. ७ व ८ वरील शास्त्रीनगर व कुरेशी नगर झोपडपट्टीच्या पुनर्विकासासाठी प्रक्रिया गतिमान करण्याचे आदेशही यावेळी देण्यात आले. बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री ॲड. आशिष शेलार, मुख्य सचिव सुजाता सौनिक उपस्थित होते.