मुंबई : पश्चिम उपनगरात पाणीपुरवठा करणाऱ्या पाली हिल जलाशयाची जलवाहिनी बदलण्यात येणार आहे. २७ फेब्रुवारी ते ११ मार्चपर्यंत जलवाहिनी मजबुतीकरणाचे काम हाती घेण्यात येणार असल्याने वांद्रे पश्चिम खार पश्चिम परिसरात १४ दिवस १० टक्के पाणी कपात करण्यात येणार असल्याचे पालिकेच्या जल विभागाकडून सांगण्यात आले.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा मुंबईत उभारण्यात आलेल्या जलाशयात साठवण्यात येतो. त्यानंतर जलाशयातून त्या त्या वॉर्डात पाणीपुरवठा करण्यात येतो. पश्चिम उपनगरातील वांद्रे खार परिसरात पाली हिल जलाशयातून पाणीपुरवठा होतो. परंतु पाली हिल जलाशय जुने झाले असून जलाशयातून पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्याही जुन्या झाल्या आहेत. त्यामुळे जलवाहिनी बदलणे व मजबुतीकरणाचे काम मंगळवार, २७ फेब्रुवारी ते सोमवार, ११ मार्च या कालावधीत हाती घेण्यात येणार आहे. सोमवार, ११ मार्चनंतर संबंधित परिसरातील पाणीपुरवठा पूर्ववत सुरू होईल, असे जल विभागाकडून सांगण्यात आले.
या भागात १० टक्के पाणी कपात
एच पश्चिम विभागातील कांतवाडी, शेरली राजन, गझधर बंध भाग आणि दांडपाडा, दिलीप कुमार झोन, कोल डोंगरी झोन, पाली माला झोन आणि युनियन पार्क झोन, खार (पश्चिम), वांद्रे पश्चिमेचा काही भाग.
पाणी जपून वापरा!
जलवाहिनी बदलणे व मजबुतीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कालावधीत वांद्रे पश्चिम व खार पश्चिम परिसरात १० टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे. तरी या कालावधीत या परिसरातील नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन पालिकेच्या जल विभागाने केले आहे.