वांद्रे ते मरिन ड्राइव्ह १२ मिनिटांत सुसाट! गुरुवारपासून प्रवासी सेवेत; कोस्टल रोडचे ९१.५८ टक्के काम पूर्ण

कोस्टल रोडच्या वांद्रे ते वरळी सी- लिंक प्रवासाची प्रतीक्षा संपुष्टात आली आहे. गुरुवार, ११ जुलैपासून वांद्रे सी-लिंक ते वरळी थडानी जंक्शनपर्यंत दोन अधिक दोनपैकी एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
वांद्रे ते मरिन ड्राइव्ह १२ मिनिटांत सुसाट!  गुरुवारपासून प्रवासी सेवेत; कोस्टल रोडचे ९१.५८ टक्के काम पूर्ण
FPJ

मुंबई : कोस्टल रोडच्या वांद्रे ते वरळी सी- लिंक प्रवासाची प्रतीक्षा संपुष्टात आली आहे. गुरुवार, ११ जुलैपासून वांद्रे सी-लिंक ते वरळी थडानी जंक्शनपर्यंत दोन अधिक दोनपैकी एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, वांद्रे सी-लिंक ते वरळीपर्यंत गुरुवारपासून एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे पालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांनी सांगितले.

कोस्टल रोड प्रकल्पाचे ९१.५८ टक्के काम पूर्ण झाले आहे. दरम्यान, वांद्रे सी-लिंक ते वरळीपर्यत जोडणाऱ्या उत्तरेकडील बाजूचे काही काम शिल्लक असल्याने वांद्रे सी-लिंक ते वरळीपर्यंत सर्व मार्गिका वाहतुकीसाठी खुली करणे सद्यस्थितीत शक्य नाही, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. कोस्टल रोडच्या कामाला वेग आला असून वांद्रे सी-लिंक ते वरळी जोडणीसाठी बो स्ट्रिंग आर्च गर्डर बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे. धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्प वांद्रे-वरळी सागरी सेतूला जोडण्यासाठी दोन तुळई (बो आर्च स्ट्रिंग गर्डर) टाकून दोन वाहिन्या तयार करण्यात आल्या आहेत. त्यामुळे वांद्रे सी-लिंक ते वरळीपर्यत गुरुवारपासून सुसाट प्रवास करता येणार आहे. यामुळे वांद्रे - वरळी सी-लिंक जोडणीचे काम पूर्ण झाल्याने मरिन ड्राइव्ह ते वांद्रे फक्त १२ मिनिटांत प्रवास पूर्ण होणार आहे.

दरम्यान, उत्तरेकडील वांद्रे सी-लिंक ते वरळीपर्यंत ४२, ४४ व ६० मीटरचे काम शिल्लक असल्याने संपूर्ण रस्ता वाहतुकीसाठी खुला करणे शक्य नाही, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

३४ टक्के इंधन, तर ७० टक्के वेळेची बचत

किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पामुळे दक्षिण मुंबईतील वाहतूककोंडी दूर होणार आहे. यामुळे सुमारे ७० टक्के वेळेची बचत, तर इंधनात ३४ टक्के बचत होणार आहे. तसेच ध्वनिप्रदूषण व वायू प्रदूषणातही घट होण्यास मदत होणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in