वांद्रे-वरळी सी- लिंक जोडणी यशस्वी; महाकाय गर्डर अवघ्या सव्वा तासांत लाँच, मिशन फत्ते होताच ‘हिप हिप हुर्रे’ आणि टाळ्यांचा गजर

कोस्टल रोड प्रकल्पातील सर्वांत आव्हानात्मक टप्पा म्हणजे वांद्रे वरळी सी- लिंकला जोडणारा दोन हजार मेट्रिक टन वजनाचा महाकाय ‘बो स्ट्रिंग आर्च गर्डर’ अवघ्या सव्वा तासांत बसवण्यात आला.
वांद्रे-वरळी सी- लिंक जोडणी यशस्वी; महाकाय गर्डर अवघ्या सव्वा तासांत लाँच, मिशन फत्ते होताच ‘हिप हिप हुर्रे’ आणि टाळ्यांचा गजर
Published on

मुंबई : कोस्टल रोड प्रकल्पातील सर्वांत आव्हानात्मक टप्पा म्हणजे वांद्रे वरळी सी- लिंकला जोडणारा दोन हजार मेट्रिक टन वजनाचा महाकाय ‘बो स्ट्रिंग आर्च गर्डर’ अवघ्या सव्वा तासांत बसवण्यात आला. समुद्रातील भरती व ओहोटीचे चॅलेंज स्वीकारत शुक्रवारी पहाटे २ ते ३.२५ वाजताच्या दरम्यान महाकाय गर्डर यशस्वीपणे बसवण्यात आला. विशेष म्हणजे समुद्रातील देशातील हा प्रयोग यशस्वी पार पाडत पालिकेने शिवधनुष्य पेलले. कोस्टल रोड प्रकल्पातील हा अभियांत्रिकी आविष्कार घडल्याने ‘ऑन द स्पॉट’ उपस्थित असलेल्या पालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांनी कोस्टल रोड प्रकल्पातील टीमचे कौतुक केले.

मुंबईतील वाहतूककोंडी फोडण्यासाठी कोस्टल रोड प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मुंबई महापालिकेचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून यातील आव्हानात्मक टप्पा म्हणजे वांद्रे-वरळी सी-लिंक जोडणी. शुक्रवारी पहाटे २ वाजेपासून या मोहिमेला सुरुवात झाली आणि पहाटे ३ वाजून २५ मिनिटांनी हे मिशन यशस्वीपणे पार पडले. या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, उपआयुक्त (विशेष अभियांत्रिकी) चक्रधर कांडलकर, प्रमुख अभियंता (मुंबई किनारी रस्ता प्रकल्प) गिरीश निकम, ‘एचसीसी’चे उपाध्यक्ष अर्जुन धवन, मोहिमेचे प्रमुख संतोष राय आदींसह अभियंते उपस्थित होते.

एकूण १०.५८ किलोमीटर लांब असलेल्या मुंबई किनारी रस्ता प्रकल्पातील अतिशय आव्हानात्मक टप्पा म्हणजे मुंबई किनारी रस्ता आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू मार्गाची सांधणी. त्यासाठी पालिका प्रशासनाने अतिशय नियोजनबद्ध तयार केली. या दोन्ही टोकांना सांधणारा पहिला बो आर्च स्ट्रिंग गर्डर बुधवारी दुपारी माझगाव डॉक येथून मार्गस्थ झाला आणि गुरुवारी पहाटे चार वाजता वांद्रे-वरळी सागरी सेतूजवळ पोहोचला.

सिमेंट काँक्रीटीकरणचा लेप

मुंबई किनारी रस्ता आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू दरम्यान स्थापन करण्यात आलेल्या तुळईवर पुढील टप्प्यात सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. या तुळईला गंज चढू नये यासाठी सी-५ या जपानी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. तसेच अतिशय प्रगत वेल्डिंग तंत्रज्ञानाद्वारे तुळईचे सुटे भाग एकमेकांना जोडण्यात आले आहेत.

बेअरिंगचा वापर करून त्यावर तुळई स्थिरावणार

मुंबई किनारी रस्ता प्रकल्पातील वरळीकडील बाजू आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू मार्गाची मुंबई किनारी रस्त्याला मिळणारी बाजू येथे प्रत्येकी दोन मेटिंग कोन आणि दोन मेटिंग युनिट बसविण्यात आले आहेत. या मेटिंग कोन आणि युनिटची योग्य सांगड बसविण्यात आली आहे. हे मेटिंग युनिट २ मीटर व्यास आणि मेटिंग कोन १.८ मीटर व्यासाचे आहेत. यानंतर मेटिंग कोन आणि युनिट असलेल्या चारही कोपऱ्यांवर जॅक बसविण्यात येतील. तसेच जॅक कार्यान्वित केल्यानंतर मेटिंग कोन आणि युनिट काढून घेण्यात येणार आहेत. पुढच्या तांत्रिक प्रक्रियेत बेअरिंगचा वापर करून त्यावर तुळई स्थिरावणार आहे. त्यानंतर जॅकदेखील काढून घेण्यात येणार आहेत.

अंबाला ते मुंबई प्रवास

बो स्ट्रिंग आर्च गर्डर ही वरळीकडून नरिमन पाईंट दिशेला जाणाऱ्या मार्गावर स्थापन करण्यात आली. ही तुळई दोन हजार मेट्रिक टन वजनाची असून, १३६ मीटर लांब आणि १८ ते २१ मीटर रुंद आहे. अंबाला (हरयाणा) येथे या तुळईचे छोटे छोटे सुटे भाग तयार करण्यात आले आहेत. तेथून तब्बल ५०० ट्रेलरच्या मदतीने हे सुटे भाग दाखल आले. सुटे भाग एकत्र जोडून नवी मुंबईतील न्हावा बंदरातून तराफाच्या मदतीने ही तुळई वरळी येथे आणली.

संयम आणि कौशल्य पणाला लावणारी १ तास २५ मिनिटे

प्रवाहकीय हवामानानुसार अंदाज घेऊन पहाटे २ वाजेपासून गर्डर स्थापनेची कार्यवाही सुरू करण्यात आली. त्यानंतर बार्जच्या मदतीने टप्प्याटप्प्याने तुळई मुंबई किनारी रस्ता आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू मार्गाच्या मधोमध आणली. सागरी लाटांचा आणि वाऱ्याच्या वेगाचा अंदाज घेत अभियंत्यांनी कौशल्य पणाला लावत सुयोग्य स्थितीत तळईला स्थिर केले. किनारी रस्त्याच्या कडेला दोन आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू मार्गाच्या कडेला दोन असे चार मेटिंग युनिट तयार करण्यात आले आहेत. त्या मेटिंग युनिटमध्ये तुळईचे चारही कोपऱ्यांना असलेले पांढऱ्या रंगाचे मेटिंग कोन ठीक ३ वाजून २५ मिनिटांनी अचूकपणे बसविण्यात आले. चारही मेटिंग कोन आणि मेटिंग युनिटची सांगड बसताच उपस्थित अधिकारी, अभियंते आणि कामगारांनी ‘हिप हिप हुर्रे’चा जयघोष करत आणि टाळ्यांच्या गजरात मोहीम फत्ते झाल्याचा आनंद व्यक्त केला.

logo
marathi.freepressjournal.in