बाणगंगा तलाव पुनरुज्जीवन दुरुस्तीच्या कामाला ब्रेक; पुरातत्त्व विभागीय कार्यालयाची कारवाई

ऐतिहासिक बाणगंगा तलावाच्या पुनरुज्जीवनाचा प्रकल्प मुंबई महापालिकेने हाती घेतला आहे. या प्रकल्पांतर्गत तलावाचे काम करताना कंत्राटदाराने जलाशयाचे नुकसान केले आहे. त्यामुळे पुरातत्त्व विभागाच्या वतीने दुरुस्तीचे काम थांबवण्यात आले आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

पूनम पोळ / मुंबई

ऐतिहासिक बाणगंगा तलावाच्या पुनरुज्जीवनाचा प्रकल्प मुंबई महापालिकेने हाती घेतला आहे. या प्रकल्पांतर्गत तलावाचे काम करताना कंत्राटदाराने जलाशयाचे नुकसान केले आहे. त्यामुळे पुरातत्त्व विभागाच्या वतीने दुरुस्तीचे काम थांबवण्यात आले आहे. या बाबतची माहिती पुरातत्त्व विभागीय कार्यालय, सहाय्यक संचालक यांनी महापालिकेच्या डी वॉर्डचे सहाय्यक आयुक्त यांना पत्राद्वारे कळवले आहे.

बाणगंगा तलावाचे पुनरुज्जीवनाचे काम पालिकेच्या माध्यमातून सुरू असले तरी तरी या कामासाठी पुरातत्त्व विभाग आणि जीएसबी टेम्पल ट्रस्ट यांचा सहभाग आहे. येथील झोपड्या हटवल्यामुळे ढिगाऱ्याखाली गाडलेल्या रामकुंडाचे पुनरुज्जीवन करण्यात येत आहे. या प्रकल्पाचे काम मे. एन. एम. इन्फ्रास्ट्रक्चरर्स व मे. बुकॉन इंजिनिअर्स अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स कंपनीला देण्यात आले आहे. प्रकल्पाचे काम तीन टप्प्यांत करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यातील कामातच कंत्राटदाराने जून महिन्यात गाळ काढण्याचे काम वेगाने करण्यासाठी उत्खनन यंत्र बाणगंगा तलावाच्या उत्तर दिशेच्या प्रवेशद्वाराने उतरवले. त्यांनतर कंत्राटदाराविरोधात कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले होते.

काही दिवसांनी जलाशयाच्या पुनरुज्जीवनाचे काम हाती घेण्यात आले. मात्र बी. आर. शहा कंत्राटदाराने जलाशयाचे नुकसान केले. यासंदर्भातील तक्रार स्थानिकानी पालिकेत पत्राद्वारे करत कामाची चौकशी करण्याची मागणी केली. बाणगंगा तलाव, मुंबई या राज्य सरंक्षित स्मारकाच्या जतन दुरुस्तीचे काम थांबवण्यात आले आहे, अशी माहिती पुरातत्त्व विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. विलास वाहने यांनी मुंबई यांना कळवले आहे. याबाबत पालिकेच्या डी वॉर्डचे सहाय्यक महापालिका सहाय्यक आयुक्त आयुक्त यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

बाणगंगा तलावाच्या पुनरुज्जीवनाला सुरुवात झाल्यापासून कंत्राटदार कामाच्या बाबतीत हयगय करत आहेत. काम सुरू असताना या ठिकाणी कोणत्याही विभागाचा अधिकारी देखरेखीसाठी त्याठिकाणी हजर नसल्याने कंत्राटदाराचा मनमानी कारभार सुरू आहे. त्यामुळे आम्ही याबाबत पालिकेला आणि पुरातत्त्व विभागाला तक्रार केली. मात्र, पालिकेने या प्रकाराची दखल घेतली नाही. परंतु, पुरातत्त्व खात्याने या गंभीर प्रकाराची चौकशी करून काम बंद करण्याचे आदेश दिले.

संजय शिर्के, तक्रारदार

logo
marathi.freepressjournal.in