भाईंदरमध्ये झालीय ‘बांगलादेश’ची निर्मिती

आधी या जागेचे नाव इंदिरा नगर असे होते, मात्र काही वर्षांपूर्वीच गूढरित्या प्रशासनाने या जागेचे नामकरण बांगलादेश असे केले
भाईंदरमध्ये झालीय ‘बांगलादेश’ची निर्मिती
Published on

सुरेश गोलानी

नालासोपाऱ्यात झालेल्या छोटा पाकिस्तानच्या निर्मितीनंतर भाईंदर मधील उत्तन येथे बांगलादेशची निर्मिती झाल्याचे उघडकीस आले आहे. मीरा-भाईंदर पालिकेच्या बस थांब्यासकट स्थानिकांच्या आधार कार्डवरील पत्त्यात देखील या जागेचा उल्लेख बांगालादेश असाच करण्यात आला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे येथे एकही विदेशी नागरिक राहात नसून सर्व स्थानिक कोळी लोकांचीच वस्ती आहे.

मीरा-भाईंदर पालिकेच्या परिवहन विभागाने आपल्या थांब्याचे नामकरण बांगलादेश असे केल्यानंतर आणि तसा ठळक फलक लावल्यानंतर ही बाब उजेडात येऊन जगजाहीर झाली. इतकेच नव्हे तर डोंगरी गावाजवळील एका चौकाचे नामकरण देखील बांगलादेश चौक असे करण्यात आले आहे. या व्यतिरिक्त पालिकेची प्रॉपर्टी टॅक्स बिले, पावत्या, जन्म/मृत्यू नोंदी यांसह आधार कार्डावर देखील या जागेचा उल्लेख बांगलादेश असाच करण्यात आला आहे. आधी या जागेचे नाव इंदिरा नगर असे होते, मात्र काही वर्षांपूर्वीच गूढरित्या प्रशासनाने या जागेचे नामकरण बांगलादेश असे केले.

येथे स्थानिक कोळ्यांची वस्ती आहे. यामुळे या जागेला हे नाव का देण्यात आले हे एक मेाठे गूढच आहे. या नावाला विरेाध असलेल्या स्थानिकांनी याबाबत प्रशासनाशी पत्रव्यवहार केला असून चूक सुधारण्याची सूचना केली आहे. आणि पूर्वीचे नाव पुन्हा देण्याची विनंतीही केली आहे. मात्र प्रशासनाने त्याकडे कानाडोळा केला आहे. येथील किनारपट्टीच्या काही भागात बंगाली बेालणारे बांगलादेशी खलाशी राहातात. ते बेाटींवर काम करतात. कदाचित या लोकांमुळेच बांगलादेश नाव देण्यात आले असावे, असा अंदाज काही व्यक्तींनी व्यक्त केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in