आंतरराष्ट्रीय विमानतळावर बांगलादेशी नागरिकाला अटक

आंतरराष्ट्रीय विमानतळावर बांगलादेशी नागरिकाला अटक

भारतीय पासपोर्टवर शारजाला जाण्याचा प्रयत्न इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी हाणून पाडला

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर रुईफ्रा थायरी मोग या बांगलादेशी तरुणाला सहार पोलिसांनी अटक केली. भारतीय पासपोर्टवर शारजाला जाण्याचा प्रयत्न इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी हाणून पाडला. अटकेनंत त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. रुईफ्रा हा मूळचा बांगलादेशी नागरिक असून, २०११ साली त्याचे आई-वडिल त्याला बांगलादेशातून बेकायदेशीररीत्या भारतात घेऊन आले होते. तेव्हापासून तो त्याच्या त्रिपुरा येथील नातेवाईकाकडे राहत होता. त्याला नातेवाईकांकडून ठेवल्यानंतर त्याचे आई-वडिल पुन्हा बांगलादेशात गेले होते. त्रिपुरा असताना रुईफ्रा याने स्थानिक शाळेत प्रवेश घेऊन दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते. दहावीनंतर त्याने बोगस दस्तावेज सादर करून भारतीय पासपोर्ट बनवून घेतले होते. याच पासपोर्टवर शारजाला नोकरीसाठी जाण्याचा त्याचा प्रयत्न होता. शुक्रवारी दुपारी दोन वाजता रुईफ्रा हा शारजाला जाण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला होता.

यावेळी त्याने त्याचे भारतीय पासपोर्ट, बोर्डिंग पास आणि मतदार ओळखपत्र इमिग्रेशन अधिकार्‍यांना दाखविले. शारजाला जाण्यामागील कारणाविषयी विचारले असता त्याने काहीच उत्तर दिले नाही. त्यामुळे त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. चौकशीदरम्यान तो बांगलादेशी नागरिक असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर त्याला पुढील कारवाईसाठी सहार पोलिसांकडे सोपविण्यात आले होते. याप्रकरणी हार्दिक भरतभाई सरवय्या यांच्या तक्रारीवरुन सहार पोलिसांनी रुईफ्राविरुद्ध भादवीसह विदेशी नागरिक कायदा कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in