
मुंबई : बोगस भारतीय पासपोर्टवर बँकॉंकला जाण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जॉय जहारलाल बाणिक या बांगलादेशी नागरिकाला सहारा पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. रविवारी रात्री साडेअकरा वाजता जॉय हा बँकॉंकला जाण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला होता. यावेळी त्याने इमिग्रेशन अधिकाऱ्यांकडे त्याचा पासपोर्ट आणि बोर्डिंग पास सादर केले. या पासपोर्टची पाहणी केल्यानंतर त्यात बांगलादेशचा व्हिसा असल्याचे आढळून आले. तो बांगलादेशी नागरिक असावा अशी शंका आल्यानंतर त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. यावेळी त्याची या अधिकाऱ्यांनी कसून चौकशी केली असता, तो इमिग्रेशन अधिकाऱ्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होता. अखेर त्याने तो बांगलादेशी नागरिक असल्याची कबुली दिली. ऑक्टोबर २०१० साली त्याची आई बांगलादेशी पासपोर्टवर भारतात आली होती. नोव्हेंबर महिन्यांत ती पुन्हा बांगलादेशात गेली. त्याचे वडिल सतत बांगलादेशी पासपोर्टवर भारतात येत होते. याच दरम्यान त्याच्या आईने बोगस भारतीय पासपोर्ट बनवून घेतले होते.