आंतरराष्ट्रीय विमानतळावर बांगलादेशी नागरिकाला अटक ;बोगस भारतीय पासपोर्टवर विदेशात गेल्याचे तपासात उघड

गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय विमानतळावर बांगलादेशी नागरिकाला अटक ;बोगस भारतीय पासपोर्टवर विदेशात गेल्याचे तपासात उघड

मुंबई- आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका बांगलादेशी नागरिकाला सहार पोलिसांनी अटक केली. मेहम्मद राबुल सिकंदर मिलन जहॉंगीर असे या बांगलादेशी नागरिकाचे नाव असून तो जकार्ता येथून अडीच वर्षांनी मुंबईत आला आहे. त्याच्याकडून पोलिसांनी एक बोगस भारतीय पासपोर्ट जप्त केला असून हा पासपोर्ट त्याने सहा वर्षांपूर्वी सुरत पासपोर्ट कार्यालयातून मिळविल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावलीद आहे. सोमवारी पहाटे मोहम्मद राबुल हा जकार्ता येथून आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला होता. यावेळी त्याने त्याचे पासपोर्टसह बोर्डिंग पास इमिग्रेशनला दिले होते. या पासपोर्टवरुन तो २२ जुलैला विदेशात गेल्याचे दिसून आले. त्याच्या पासपोर्टवर त्याचे जन्मस्थान कोलकाता येथील शामनगर होते. मात्र त्याने पासपोर्ट सुरत पासपोर्ट कार्यालयातून काढले होते. याबाबत त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने उत्तर देण्याचे टाळले होते. त्याच्या बोलीभाषेवरुन तो बांगलादेशी नागरिक असल्याचा संशय आल्याने त्याला इमिग्रेशन अधिकार्‍यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीदरम्यान त्याने तो बांगलादेशी नागरिक असल्याचे तसेच ऑगस्ट २०१७ साली कोलकाता येथील हरिदासपूर सिमेवरुन बांगलादेशातून भारतात आल्याची कबुली दिली. त्यानंतर तो सुरत येथे वास्तव्यास होता. तिथेच त्याने बोगस दस्तावेज सादर करुन पॅनकार्ड, आधारकार्ड आणि जन्मदाखला बनवून घेतले होते. या कागदपत्रावरुन त्याने भारतीय पासपोर्ट मिळविला होता. याच पासपोर्टवर तो २२ जुलै २०१९ रोजी मलेशिया येथे गेला होता. त्यानंतर तो आता जकार्ता येथून मुंबईत परत आला होता. तपासात ही बाब समोर येताच त्याला पुढील चौकशीसाठी सहार पोलिसांकडे सोपविण्यात आले होते. याप्रकरणी बलराम घिसाराम यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी मोहम्मद राबुलविरुद्ध गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in