बनावट भारतीय पासपोर्टद्वारे बांगलादेशी युरोपात दाखल गुप्तचर खात्याची माहिती

बनावट भारतीय पासपोर्टद्वारे बांगलादेशी युरोपात दाखल गुप्तचर खात्याची माहिती

सध्या भारताचा आंतरराष्ट्रीय पातळीवर दबदबा वाढला आहे

मुंबई : बांगलादेशी नागरिक युरोपियन देशांमध्ये आश्रय मिळविण्याच्या उद्देशाने भारतीय पासपोर्ट बनावट मार्गाने मिळवत आहेत. या पद्धतीची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. परकीय प्रादेशिक नोंदणी कार्यालयाकडे (एफआरआरओ) अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत, ज्यात बेकायदेशीर बांगलादेशी फसवणूक करून भारतीय पासपोर्ट मिळवण्यासाठी बौद्ध असल्याचे दाखवले जात आहे. त्यानंतर युरोपात गेल्यानंतर ते त्यांचे बनावट भारतीय पासपोर्ट आणि भारतीय ओळख नष्ट करतात आणि युरोपमध्ये आश्रय घेण्यासाठी त्यांची खरी बांगलादेशी असल्याची ओळख उघड करतात.

‘एफआरआरओ’चे पोलीस उपायुक्त नियती ठाकेर-दवे यांनी ‘नवशक्ति’शी बोलताना सांगितले की, याबाबत अनेक प्रकरणे आम्ही उघड केली असून सहार पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदवले आहेत. हे प्रकरण चौकशीसाठी मध्यवर्ती तपास यंत्रणेकडे सोपवले आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, बांगलादेशी नागरिक भारतात बौद्ध असल्याचे सांगून भारतीय पासपोर्टची मागणी करतात. त्याच्या आधारावर ते युरोपमध्ये राजाश्रय मागतात. हे अवैध बांगलादेशी चकमा या आदिवासी समूहातील असल्याचा संशय आहे. त्यांना बांगलादेशात सापत्न वागणूक मिळत असते. त्यांना दुय्यम दर्जाचे नागरिक समजले जाते. त्यांच्यावर अनेक अत्याचार झाले आहेत. बांगलादेश सशस्त्र दलांनी त्यांच्यावर अमानवी कृत्ये केली. त्यांना बांगलादेशी नागरिक समजण्याऐवजी बुद्धिस्ट आदिवासी निर्वासिताची वागणूक दिली जाते. हे चकमा व हजँग जातीचे लोक अरुणाचल प्रदेश, मिझोराम, त्रिपुराच्या जवळ राहतात. त्यांची सध्याची परिस्थिती बिकट आहे.

सध्या भारताचा आंतरराष्ट्रीय पातळीवर दबदबा वाढला आहे. त्यामुळे भारतीय पासपोर्टचे नामांकन वाढले आहे. यामुळे भारतीय नागरिकांना युरोपियन देशात प्रवेश मिळणे सोपे जाते. भारतीय शिक्षण, रोजगार व पर्यटनासाठी युरोपात जातात. बांगलादेशातील बुद्धिस्टांनी ही बाब हेरली. आशियाई देशातून येणाऱ्या नागरिकांवर युरोपात बारकाईने नजर ठेवली जाते. त्यांना व्हिसा देताना बारीकसारीक चौकशी केली जाते.

त्यामुळेच चकमा बांगलादेशी भारताचा पासपोर्ट मिळवून युरोपात जातात. विशेष करून स्पेन, लंडन, स्वीडन, फ्रान्स येथे आश्रय घेतात. तेथे पोहचल्यावर भारतीय पासपोर्ट नष्ट करतात आणि आमच्या जमातीला बांगलादेशात धोका असल्याचे सांगून तेथे राजाश्रय मागतात. युरोपात त्यांना सुरक्षित रोजगाराच्या संधी मिळू शकतात. आपल्या भावी पिढ्या चांगल्या होतील व युरोपियनांसारखे चांगले जीवन जगतील, अशी अपेक्षा ते बाळगतात.

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र एटीएसने नागपूरला ४० वर्षीय पलाश बिपन बरुआ या बांगलादेशी नागरिकाला अटक केली. तो भारतात दहा वर्षांहून अधिक काळ वास्तव्यास होता. तो बौद्ध धर्मगुरू म्हणून काम करत होता. तसेच तो जीम ट्रेनर म्हणूनही कार्यरत होता. तसेच बनावट पद्धतीने भारतीय पासपोर्ट देण्याचे रॅकेट तो चालवत असल्याचे उघड झाले. मैत्री बरुआ व अंकुन बरुआ या बांगलादेशी नागरिकांना अटक केल्यानंतर त्यांच्याकडून पलाश बिपन बरुआ यांच्या कारवायांची माहिती मिळाली.

logo
marathi.freepressjournal.in