
मुंबई : बोगस सोने देऊन गोल्ड लोन घेऊन बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी एका महिलेसह दोघांविरुद्ध ओशिवरा पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. रमाकांत दिनकर भाटले आणि सपना कुमार भट्ट अशी या दोघांची नावे असून, या दोघांविरुद्ध अपहारासह फसवणुकीच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल झाल्याचे पोलिसांनी सांगितले. जोगेश्वरीतील एका खासगी बँकेत तक्रारदार मॅनेजर म्हणून काम करतात. तीन वर्षांपूर्वी त्यांच्या बँकेतून रमाकांत भाटले याने गोल्ड लोन घेतले होते. त्याने दिलेल्या सोन्यावर त्याला ५ लाख ६२ हजार रुपयांचे लोन मंजूर झाले होते.
यावेळी सोन्याचे व्हॅल्यूलेशनसाठी बँकेच्या वतीने सपना भट्ट हिने काम पाहिले होते. लोन दिल्यानंतर काही महिने रमाकांतने नियमित हप्ते भरले होते. सुमारे ७० हजार रुपयांचे हप्ते भरल्यानंतर त्याने पुढील हप्ते भरणे बंद केले होते. त्यामुळे त्याला बँकेने नोटीस बजाविली होती; मात्र या नोटीसवर त्याच्याकडून काही उत्तर आले नव्हते. एप्रिल २०२२ रोजी त्याने सादर केलेल्या सोन्याच्या दागिन्यांची तपासणी केली असता, त्याने गोल्ड लोन घेताना दिलेले सर्व सोन्याचे दागिने बोगस असल्याचे उघडकीस आले होते.