
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, तर आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे राज्याचे माजी पर्यटनमंत्री राहिले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या पत्नीदेखील नेहमी अनेक कार्यक्रमांना हजेरी लावल्यामुळे चर्चेत असतात. मात्र, त्यांच्या कुटुंबातील आणखीन एक नाव राजकारणाच्या मैदानात येणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. ते नाव म्हणजे उद्धव ठाकरे यांचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरे (Tejas Thackeray). त्यांच्या नावाने एक पोस्टर सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. यामुळे आता राजकारणाच्या वर्तुळात वेगळीच चर्चा रंगली आहे.
तेजस ठाकरे यांचे एक पोस्टर मुंबईतील गिरगाव येथे शिवसेना ठाकरे गटाच्या समर्थकांनी लावले होते. ते पोस्टर सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. 'आजची शांतता.... उद्याचे वादळ... नाव लक्षात ठेवा तेजस उद्धव साहेब ठाकरे' असे या पोस्टरवर लिहिले होते. यापूर्वीही ठाकरे गटाच्या समर्थकांकडून त्यांना युवासेना प्रमुख म्हणून जबाबदारी देण्याची मागणी केली होती. यासंदर्भात, गिरगावचे शाखाप्रमुख निलेश अहिरेकर आणि उपविभाग संघटक विशाल सागवेकर यांनी हे पोस्टर लावले आहे. निलेश अहिरेकर म्हणाले की, "स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंची छबी आम्हाला तेजस ठाकरे यांच्यामध्ये दिसते. स्वतः बाळासाहेब म्हणाले होते की, तेजस हा माझ्यासारखा आहे. त्यामुळे त्यांनी लवकर राजकारणात यावे, अशा आमच्या भावना आहेत."