बापटनाला ते धारावी मलजल प्रक्रिया प्रकल्पाला वेग

मिठी नदीतील पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासह नदी पुनरुज्जीवन करण्यासाठी चार पॅकेजमध्ये काम हाती घेण्यात आले आहे.
बापटनाला ते धारावी मलजल प्रक्रिया प्रकल्पाला वेग
Published on

मुंबई : मिठी नदीतील पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासह नदी पुनरुज्जीवन करण्यासाठी चार पॅकेजमध्ये काम हाती घेण्यात आले आहे. प्रकल्प- पॅकेज चारअंतर्गत पालिकेने २.६० मीटर व्यास असलेल्या भूमिगत मलजल बोगद्याचे खोदकाम हाती घेतले आहे. बापट नाला आणि सफेद पूल नाल्यापासून धारावी मलजल प्रक्रिया प्रकल्पापर्यंत हा बोगदा तयार करण्यात येत आहे. एकूण तीन टप्प्यांत हे काम होत आहे. त्यापैकी दुसऱ्या टप्प्यातील मलजल बोगद्याचे ‘ब्रेक-थ्रू’ कनाकिया झिलिऑन (सांताक्रूझ-चेंबूर जोडरस्ता) लाल बहादूर शास्त्री मार्ग येथे बुधवारी यशस्वीपणे पूर्ण झाले.

बापट नाला आणि सफेद पूल नाल्यातून मिठी नदीत जाणारे अंदाजे १६८ दशलक्ष लीटर प्रतिदिन इतके पाणी या भूमिगत मलजल बोगद्याद्वारे धारावी येथील मलजल प्रक्रिया केंद्रात वाहून नेण्यात येणार आहे. त्यानंतर मलजलावर प्रक्रिया करून माहीम निसर्ग उद्यान येथील खाडीत सोडण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे मिठी नदीचे पाणी स्वच्छ होणार असून पर्यावरणाचे संतूलन टिकून राहणार आहे.

सांडपाणीमिश्रित पाणी मिठी नदीमध्ये न जाता या पाण्यावर प्रक्रिया करण्याच्या अनुषंगाने या प्रकल्पाचे महत्त्व अधिक आहे. मिठी नदीमध्ये सांडपाणी मिश्रित होण्याआधीच या पाण्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. परिणामी समुद्रकिनारा परिसर स्वच्छ राहतानाच पर्यावरणालाही या प्रक्रिया केलेल्या पाण्याचा फायदा होणार आहे. तसेच समुद्रकिनारी परिसरात राहणाऱ्या नागरिकांनाही या पाण्याचा फायदा होईल, अशी माहिती अतिरिक्त पालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी दिली.

१४ नोव्हेंबर २०२२ रोजी धारावी मलजल प्रक्रिया केंद्र येथे तीन टप्प्यापैकी पहिल्या टप्प्यातील बोगद्यासाठी खोदकाम सुरू करण्यात आले होते. सुमारे १.८३५ किलोमीटर लांबीपर्यंत खणन पूर्ण झाल्यानंतर दिनांक १३ जून २०२३ रोजी कुर्ला उद्यान येथे पहिला ‘ब्रेक-थ्रू’ यशस्वीपणे पार पडला. यानंतर आज कनाकिया झिलिऑन, लाल बहादूर शास्त्री मार्ग येथे दुसरा ब्रेक-थ्रू पार पडला.

असा आहे भूमिगत मलजल बोगदा

मुंबई मलनिःसारण प्रकल्प अंतर्गत हा भूमिगत मलजल बोगदा बांधण्यात येत आहे. बोगद्याची एकूण लांबी ६.७० किलोमीटर तर सरासरी खोली सुमारे १५ मीटर आहे. भारतातील सर्वात लहान व्यासाचा असा हा मलजल बोगदा आहे. त्याचा अंतर्गत व्यास २.६० मीटर आहे. तर बाह्य व्यास ३.२० मीटर आहे. बोगद्याच्या संरेखनामध्ये एकूण ५ शाफ्ट प्रस्तावित आहेत. हा मलजल बोगदा सेगमेंटल लाइनिंग पद्धतीने तसेच अर्थ प्रेशर बॅलन्स टनेल बोरिंग मशीन वापरून बांधला जात आहे.

तिसरा टप्पा लवकरच?

आता तिसऱ्या टप्प्यात सांताक्रूज-चेंबूर जोडरस्ता जंक्शन शाफ्ट ते बापट नाला या मार्गावर भूमिगत बोगदा खोदण्यात येणार आहे. तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील या बोगद्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. त्याची एकूण लांबी ३.१० किलोमीटर असेल.

मलजल वहन क्षमता ४०० दशलक्ष!

या संपूर्ण प्रकल्पाची एकूण मलजल वहन क्षमता प्रतिदिन ४०० दशलक्ष लीटर इतकी आहे. सध्या यातून प्रतिदिन १६८ दशलक्ष लीटर इतका बिगर पावसाळी प्रवाह वाहून नेण्यात येणार आहे. मुंबई महानगरातील लोकसंख्या वाढीचे प्रमाण लक्षात घेत सन २०५१ पर्यंतचे नियोजन या बोगद्याच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in