बाप्पा पावला; पाणीकपातीचे विघ्न टळले

मुंबईसाठी पुढील ३६५ दिवसांचा पाणीसाठा उपलब्ध ; पी वेलरासू यांची माहिती
बाप्पा पावला; पाणीकपातीचे विघ्न टळले

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात ही धरणात सोमवार १८ सप्टेंबर रोजी सातही धरणात ९७.३१ टक्के म्हणजेच १४ लाख ८ हजार ३८३ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. हा पाणीसाठा १ ऑक्टोबर २०२४पर्यंत मुंबईची तहान भागेल इतका उपलब्ध झाल्याने मुंबईवरील पाणीकपात टळली आहे. दरम्यान, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांत सद्यस्थितीत पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असल्याने पाणी कपात होणार नसल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी वेलरासू यांनी सांगितले.

मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, विहार व तुळशी या सात धरणांतून मुंबईला दररोज ३९०० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा होतो. मुंबईची वर्षभराची तहान भागवण्यासाठी सात धरणात १४ लाख ४७ हजार ३४३ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध असणे गरजेचे असते. यंदा जून महिना कोरडा गेल्याने १ जुलैपासून मुंबईत १० टक्के पाणी कपात लागू करण्यात आली होती. परंतु ऑगस्टच्या सुरुवातीला पावसाने धरण क्षेत्रात हजेरी लावल्याने ८ ऑगस्ट रोजी १० टक्के पाणी कपात रद्द करण्यात आली. परंतु धरण क्षेत्रातील पाण्याच्या पातळीत समाधानकारक वाढ होत नसल्याने सप्टेंबर १५ नंतर आढावा घेत पुन्हा एकदा पाणी कपातीचा निर्णय विचाराधीन असल्याचे पालिकेच्या जल विभागाकडून सांगण्यात आले होते. मात्र सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून वरुणराजाची धरणात बॅटिंग सुरू असल्याने सातही धरणातील ९७.३१ टक्के पाणी साठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे मुंबईची वर्षभराची तहान भागेल इतका पाणीसाठा उपलब्ध असल्याने पाणी कपात होणार नसल्याचे पी वेलरासू यांनी स्पष्ट केले.

१८ सप्टेंबर रोजी सातही धरणातील पाणीसाठा ( दशलक्ष लिटर)

मोडक सागर - १,२६,२३८
अप्पर वैतरणा - २,१०,६५३
तानसा - १,४४,६५२
मध्य वैतरणा - १,८९,४२३
भातसा - ७,०१,६७३
तुळशी - ८,०४६
विहार - २७,६९८

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in