केळीच्या खांबांच्या गाभ्यापासून बाप्पा साकारला

कचरापेटीत जाण्याआधीच केळीचे खांब घरी आणून मूर्तीकार राजू यांच्या मदतीने ही पर्यावरणपूरक मूर्ती बनवण्यात आली
केळीच्या खांबांच्या गाभ्यापासून बाप्पा साकारला

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तीमुळे पर्यावरणास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे शाडूच्या मातीपासून वेगवेगळे पर्यावरणपूरक पर्याय शोधले जात आहेत. यासाठी विविध प्रयोग सुरू असताना बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहिबावकर यांच्या कुटुंबियांनी आपल्या घरात केळीच्या खांबांच्या गाभ्यापासून बाप्पा साकारला आहे. कमी वजनाची मूर्ती, खर्च अतिशय किफायतशीर आणि पर्यावरणाचे रक्षणास अनेक गोष्टी या मूर्तीतून साध्य झाल्या आहेत. यंदा मूर्ती बनवण्याचा एक नवीन प्रयोग या कुटुंबियांनी केला आहे. लग्नकार्यात वापरलेले व कचरापेटीत जाण्याआधीच केळीचे खांब घरी आणून मूर्तीकार राजू यांच्या मदतीने ही पर्यावरणपूरक मूर्ती बनवण्यात आली आहे.

असे साकारले गणराय...

मूर्तीकार राजू मयेकर हे गेली १२ वर्ष घरगुती व सार्वजनिक १० ते १२ फुटाच्या कागदी मूर्ती करतात. यंदाच्या वर्षी प्रथमच केळीच्या खांबापासून मूर्ती त्यांनी घडवली आहे. केळीच्या खांबाचे बारीक तुकडे करून ते एक रात्र पाण्यात भिजत ठेवण्यात आले. दुसऱ्या दिवशी या तुकड्यांची मिक्सरमधे पेस्ट करण्यात आली. त्यात टिश्यू पेपर, खडू पावडर व गोंद मिसळून लगदा तयार करण्यात आला. हा लगदा मुर्तीच्या विविध शारिरीक आकारानुसार साच्यात ठेवून मिश्रणाचा एकावर एक थर थापण्यात आला. त्यानंतर हे साचे कडक ऊन्हात सुकवण्यात आले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in