'बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया कॉस्मेटिक नाही, तर जीवनरक्षक!' विमा कंपनीला ग्राहक न्यायालयाचा दणका; वैद्यकीय दावा फेटाळणे पडले महागात

लठ्ठपणा कमी करण्यासाठी केली जाणारी ‘बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया’ ही केवळ सौंदर्य प्रसाधनाचा (कॉस्मेटिक) भाग नसून अतिलठ्ठपणा आणि त्या संबंधित इतर गंभीर आजारांवर उपचार करण्यासाठीची ती एक जीवनरक्षक शस्त्रक्रिया आहे, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा दक्षिण मुंबई जिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोगाने (डीसीडीआरसी) एका ताज्या निकालात दिला आहे.
'बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया कॉस्मेटिक नाही, तर जीवनरक्षक!' विमा कंपनीला ग्राहक न्यायालयाचा दणका; वैद्यकीय दावा फेटाळणे पडले महागात
'बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया कॉस्मेटिक नाही, तर जीवनरक्षक!' विमा कंपनीला ग्राहक न्यायालयाचा दणका; वैद्यकीय दावा फेटाळणे पडले महागात
Published on: 

प्रणाली लोटलीकर/मुंबई

लठ्ठपणा कमी करण्यासाठी केली जाणारी ‘बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया’ ही केवळ सौंदर्य प्रसाधनाचा (कॉस्मेटिक) भाग नसून अतिलठ्ठपणा आणि त्या संबंधित इतर गंभीर आजारांवर उपचार करण्यासाठीची ती एक जीवनरक्षक शस्त्रक्रिया आहे, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा दक्षिण मुंबई जिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोगाने (डीसीडीआरसी) एका ताज्या निकालात दिला आहे. नेपियन सी रोड येथे राहणाऱ्या एका महिलेचा वैद्यकीय दावा (मेडिक्लेम) चुकीच्या पद्धतीने फेटाळून लावल्याप्रकरणी आयोगाने 'न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स कंपनी'ला चांगलेच फटकारले आहे.

ग्राहक आयोगाने विमा कंपनीला शस्त्रक्रियेच्या खर्चापोटी ५.३७ लाख रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय, २०१९ मध्ये तक्रार दाखल केल्याच्या तारखेपासून रक्कम मिळेपर्यंत त्यावर वार्षिक ९ टक्के व्याज देण्यासही सांगण्यात आले आहे तसेच तक्रारदाराला झालेल्या शारीरिक आणि मानसिक त्रासापोटी २५,००० रुपये आणि कायदेशीर खर्चापोटी अतिरिक्त ३० हजार रुपये भरपाई देण्याचे निर्देशही आयोगाने दिले आहेत.

या निर्णयामुळे वैद्यकीय गरज म्हणून केल्या जाणाऱ्या बॅरिएट्रिक शस्त्रक्रियांबाबत विमा कंपन्यांनी केवळ कॉस्मेटिक उपचाराचा शिक्का मारून दावा नाकारू नये, असा स्पष्ट संदेश विमाधारकांना मिळाला आहे.

कंपनीने दावा फेटाळला

विमा कंपनीने पॉलिसीतील 'अपवाद खंडा'चा आधार घेत हा दावा फेटाळला होता. या खंडात विश्रांतीचे उपचार, लठ्ठपणावरील उपचार आणि त्यातील गुंतागुंत, जन्मजात बाह्य आजार, वंध्यत्व, मानसोपचार, तसेच कॉस्मेटिक उपचारांचा समावेश होता, ज्यासाठी मेडिक्लेमचे फायदे दिले जात नाहीत, असा कंपनीचा दावा होता.

काय आहे प्रकरण?

तक्रारदार महिला ही ३२ वर्षीय डॉक्टर असून, २०१७ मध्ये तिला अतिलठ्ठपणा, उच्च रक्तदाब तसेच गुडघे आणि पाठदुखीचा त्रास सुरू झाला होता. या वैद्यकीय स्थितीवर उपचार करण्यासाठी गॅस्ट्रोइंटेस्टायनल आणि बॅरिएट्रिक सर्जन डॉ. महेंद्र नरवरिया यांनी तिला ४ ऑगस्ट आणि १८ नोव्हेंबर २०१७ रोजी दिलेल्या प्रमाणपत्रांद्वारे बॅरिएट्रिक शस्त्रक्रियेचा सल्ला दिला होता. मात्र, विमा कंपनीने हा दावा फेटाळला. त्यानंतर तिने ५,३७,२५० रुपयांच्या परताव्यासाठी ग्राहक आयोगाकडे धाव घेतली होती.

आयोगाचे निरीक्षण

आयोगाने नमूद केले की ३० ऑक्टोबर २०२५ रोजी विमा कंपनीने पॉलिसीच्या अटी आणि शर्ती सादर करण्यासाठी वेळ मागितला होता. मात्र, एक वर्ष उलटून गेल्यानंतरही ते आयोगासमोर पॉलिसीच्या अटी सादर करू शकले नाहीत. आयोगाने आपल्या अंतिम निकालात स्पष्ट केले की, बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया ही कॉस्मेटिक प्रक्रिया नसून ती अतिलठ्ठपणा, टाइप-२ मधुमेह, उच्च रक्तदाब, सांधेदुखी, स्लीप अॅपनिया आणि पाठदुखी यांसारख्या आजारांवर उपचारासाठी वैद्यकीयदृष्ट्या शिफारस केलेली एक आवश्यक प्रक्रिया आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)