दादर, माटुंगा येथील बत्ती गूल नागरिकांचा संताप

शिवाजी पार्क विभागात वीज गेल्याने दुकानदार व नर्सिंग होमना त्याचा मोठा फटका बसला
दादर, माटुंगा येथील बत्ती गूल नागरिकांचा संताप
Published on

मुंबई : मुंबईच्या मध्यमागी असलेल्या आणि सर्वांमध्ये लोकप्रिय असलेल्या दादर (प.), शीतलादेवी मंदिर परिसरात मंगळवारी रात्री बत्ती गूल झाली. मुंबईतील महत्वाचे ठिकाण असलेल्या या निवासी व व्यापारी भागातील वीज गेल्याने नागरिक व व्यापाऱ्यांना अंधारात चाचपडावे लागले. दरम्यान, बेस्टकडे आपात्कालिन नियोजन नसल्याने रहिवाशांनी संताप व्यक्त केला.

दादर पश्चिमेकडील विशेषत: शिवाजी पार्क, शीतला देवी मंदिर आणि त्यांच्या आजूबाजूच्या परिसरात मंगळवारी प्रदीर्घ वीज खंडित झाला. परिणामी रहिवाशांची गैरसोय झाली. जवळच असलेल्या दोन पॉवर ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्यामुळे वीज गायब झाली. सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास वीज पुरवठा खंडित झाला.

या परिस्थितीची तीव्रता ओळखून, ‘बेस्ट’ने त्वरीत कार्यवाहीला सुरुवात केली. बंद पडलेल्या ट्रान्सफॉर्मरचा भार हळूहळू परिसरातील इतर कार्यरत ट्रान्सफॉर्मर्सकडे वळवण्यात आला," एका अधिकाऱ्याने सांगितले.

रात्रौ ८ वाजण्याच्या सुमारास ५० टक्के वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला. तर रात्रौ ९ वाजण्याच्या सुमारास सर्व विभागातील वीज पुरवठा सुरु झाला, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

या ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड होण्याची कारणे शोधली जात आहे.

मध्य मुंबईत शिवाजी पार्क हा महत्वाचा भाग आहे. शिवाजी पार्क विभागात वीज गेल्याने दुकानदार व नर्सिंग होमना त्याचा मोठा फटका बसला. या प्रकारापासून धडा घेत भविष्यात अशा घटना घडू नये म्हणून विशेष दक्षता घ्यावी, असे नागरिकांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in