'बीबीए-बीसीए' सीईटी परीक्षेचे अर्ज भरण्यास सुरुवात; १६ फेब्रुवारीपर्यंत भरता येणार अर्ज : २८ ते ३० एप्रिलला परीक्षा

बीबीए, बीसीए, बीएमएस, बीबीएमसह इंटिग्रेटेड एमबीए आणि एमसीए या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षेचे अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. विद्यार्थ्यांना १६ फेब्रुवारीपर्यंत अर्ज भरता येणार आहे. तर या अभ्यासक्रमांची सीईटी परीक्षा २८ ते ३० एप्रिल या कालावधीत घेण्यात येणार आहे.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : बीबीए, बीसीए, बीएमएस, बीबीएमसह इंटिग्रेटेड एमबीए आणि एमसीए या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षेचे अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. विद्यार्थ्यांना १६ फेब्रुवारीपर्यंत अर्ज भरता येणार आहे. तर या अभ्यासक्रमांची सीईटी परीक्षा २८ ते ३० एप्रिल या कालावधीत घेण्यात येणार आहे.

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी कक्ष) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी बी.एचएमसीटी, बीसीए, बीबीए, बीबीएम, बीएमएस, एमबीए (इंटिग्रेटेड) आणि एमसीए (इंटिग्रेटेड) या सात अभ्यासक्रमांसाठी सीईटी घेण्यात येणार आहे. या परीक्षांची नोंदणी, वेळापत्रक तसेच माहिती पुस्तिका www.mahacet.org या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

ही सीईटी राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. गेल्या वर्षी बी.एचएमसीटी सीईटीसाठी १,४३६ तर बीसीए, बीबीए, बीएमएस, बीबीएम, इंटिग्रेटेड एमबीए आणि एमसीए या अभ्यासक्रमांच्या सीईटीसाठी एकूण १,१२,९२६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. दरम्यान, यंदापासून सीईटी नोंदणीसाठी ‘ऑटोमेटेड पर्मनंट अकॅडेमिक अकाऊंट रजिस्ट्री’ (अपार) आयडी अनिवार्य करण्यात आला असून, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी यूडीआयडीही बंधनकारक करण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in