जिवंत असताना मोठ्या घरात जाता आले याचे समाधान; ७५ वर्षांच्या कृष्णाबाई काळे यांची भावना

अनेक वर्षांपासून बीडीडी चाळींच्या पुनर्विकासासाठी प्रयत्न सुरू आहेत. परंतु येथील रहिवाशांचे स्वप्न सरकारने सत्यात उतरवून दाखविले आहे. आमच्यासारख्या म्हाताऱ्यांना जिवंत असताना मोठ्या घरात जाता आले, याचे समाधान असल्याची प्रतिक्रिया ७५ वर्षांच्या कृष्णाबाई काळे यांनी व्यक्त केली.
जिवंत असताना मोठ्या घरात जाता आले याचे समाधान; ७५ वर्षांच्या कृष्णाबाई काळे यांची भावना
Published on

मुंबई : अनेक वर्षांपासून बीडीडी चाळींच्या पुनर्विकासासाठी प्रयत्न सुरू आहेत. परंतु येथील रहिवाशांचे स्वप्न सरकारने सत्यात उतरवून दाखविले आहे. आमच्यासारख्या म्हाताऱ्यांना जिवंत असताना मोठ्या घरात जाता आले, याचे समाधान असल्याची प्रतिक्रिया ७५ वर्षांच्या कृष्णाबाई काळे यांनी व्यक्त केली.

बीडीडी चाळ वरळी येथे पुनर्विकासाच्या कामाला सुरुवात होण्यापूर्वी स्थानिकांचा विरोध होता. हा विरोध डावलून म्हाडाला सर्वात आधी घर रिक्त करून देणाऱ्या आणि रहिवाशांच्या रोषाला सामोरे जाणाऱ्या कृष्णाबाई काळे यांचा विशेष सन्मान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आला.

या आजींनी आमच्यावर जर विश्वास दर्शविला नसता तर कदाचित पुनर्विकास लांबणीवर पडला असता, असे कौतुक मंत्र्यांनीयावेळी केले. वरळीतील पात्र ५५६ रहिवाशांपैकी प्रायोगिक तत्त्वावर १६ रहिवाशांना चावी वाटप करण्यात आले. या १६ जणांमध्ये निम्म्याहून अधिक नागरिक ७० वर्षांवरील होते. यामध्ये बिपिन कुलकर्णी, स्मिता शेट्ये, शुभांगी गुरव, चंद्रकांत बावडेकर, फुलाबाई भोसले, विजय कासले, ज्युलिअस डिसोझा, विजया मयेकर, देवानंद ढिका, प्रमोद शेलार, सीमा सावंत, विश्वजीत भोसले, बजरंग काळे यांचा समावेश होता.

म्हाडा पाच वर्षांत ८ लाख घरे बांधणार

मुंबई : म्हाडाने आपल्या आजवरच्या वाटचालीत आतापर्यंत ९ लाख घरांचे वाटप केले आहे. पुढील पाच वर्षांत ८ लाख घरे बांधण्याचे म्हाडाचे नियोजन असल्याचे प्रतिपादन गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता यांनी या कार्यक्रमाच्या प्रास्ताविक भाषणात केले.

गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता यांचे प्रतिपादन

बीडीडी चाळ प्रकल्पात पूर्ण झालेल्या दोन पुनर्वसन इमारतींतील ५५६ पात्र रहिवाशांना सदनिकांचे वितरण गुरुवारी करण्यात आले. यावेळी गुप्ता बोलत होते.

बीडीडी पुनर्विकास प्रकल्प हा आशियातील सर्वात मोठा शहरी गृहनिर्माण पुनर्विकास प्रकल्प आहे. या प्रकल्पातून १५ हजार ५०० घरे निर्माण होणार आहेत. सध्या ६ हजार ३०० घरांचे काम सुरू असून वर्षाअखेर ३ हजार ५०० घरांचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल. त्याप्रमाणे येत्या दोन ते तीन वर्षांत सर्वांना घरे देण्यात येतील, असा विश्वास गुप्ता यांनी यावेळी व्यक्त केला.

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडून घरांची पाहणी

वरळीतील बीडीडी चाळीत अनेक पिढ्यांपासून राहणाऱ्या कुटुंबांसाठी आजचा दिवस विशेष ठरला. बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील बांधकाम पूर्ण झालेल्या दोन पुनर्वसन इमारतीतील सदनिकांच्या वाटप कार्यक्रमापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी इमारतीची व सदनिकेची पाहणी केली.

बीडीडी चाळीमध्ये आमच्या ३ पिढ्या झाल्या. नवीन घरात राहण्यास जाण्याचे वडिलांचे स्वप्न होते. आज हे स्वप्न साकार होत आहे याचा आनंद आहे. - भूषण शेट्ये, वरळी बीडीडी रहिवाशी

प्रकल्पाची सद्यस्थिती

बीडीडी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत मुंबईतील वरळी, ना. म. जोशी मार्ग-परळ, नायगाव येथील सुमारे ८६ एकरवर वसलेल्या सुमारे २०७ चाळींचा समावेश आहे. बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाद्वारे १५ हजार ५९३ रहिवाशांचे पुनर्वसन केले जात आहे. ना. म. जोशी मार्ग-परळ प्रकल्पामध्ये २ हजार ५६० निवासी व अनिवासी गाळे असून १४ पुनर्वसन इमारती बांधल्या जात आहेत. नायगाव (दादर) येथे ३ हजार ३४४ निवासी व अनिवासी गाळे, २० पुनर्वसन इमारती उभारण्याचे काम सुरू आहे.

वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प

  • जुन्या चाळींची संख्या - १२१

  • भाडेकरूंची संख्या - ९६८९

  • पुनर्वसन इमारतींची संख्या -३४

  • प्रकल्पाचे टप्पे - २

नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प

  • जुन्या चाळींची संख्या - ४२

  • भाडेकरूंची संख्या- ३३४४

  • पुनर्वसन इमारतींची संख्या २०

  • प्रकल्पाचे टप्पे - २

ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प

  • जुन्या चाळींची संख्या - ३२

  • भाडेकरूंची संख्या - २५६०

  • पुनर्वसन इमारतींची संख्या -१४

  • प्रकल्पाचे टप्पे - २

logo
marathi.freepressjournal.in