मुंबई हे शहर पर्यटनासाठी खूप मोठ्या प्रमाणात ओळखले जाते. लोक मुंबईची सुंदरता पाहण्यासाठी खूप दुरुन येतात. तसंच मुंबईचं आकर्षण असलेली जुहू चौपाटीला पर्यटक आवर्जून भेट देतात. पण आता जर तुम्ही जुहू चौपाटीला फिरायला जात असाल तर थोडी सावधानी बाळगा, असं सांगण्यात आलं आहे. याचं कारणही तसंच आहे. मागील आठवड्याभरापासून मोठ्या प्रमाणावर जेलीफिश जुहू चौपाटीवर आढळत आहेत. जुहू चौपाटीवर फिरण्यासाठी आलेल्या सहा पर्यटकांना जेलीफिश या माशांनी दंश केल्याची घटना समोर आली आहे.
यात चार ते सहा वयोगटातील दोन मुले आणि एका मुलीचा समावेश आहे. जुहू चौपाटीवर फिरायला जाणाऱ्या मुंबईकरांनी काळजी घेण्याची गरज आहे. असं आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे. हे फीश पायाला चिकटत असल्यामुळे ते सहज काढता येत नाहीत. यामुळे मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांनी फिरण्यासाठी जाऊ नये, असं आवाहन मुंबई महापालिकेकडून करण्यात आलं आहे.
मेहताब शेख (20), दिक्षाद मेहता (5), मोहम्मद मसुरी (4), मेटवीश शेख (6), मोहम्मद राजौल्लाह (22) आणि आराथ्रीहा प्रमूह (25) अशी जेली फीशने दंश केलेल्या व्यक्तींची नावं आहेत. या सर्वांवर मुंबई महानगरपालिकेच्या विलेपार्ले पश्चिमेकडील कूपर रुग्णालयात उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.
दरवर्षी पावसाळ्यात मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर मोठया प्रमाणात जेलीफिश दिसून येतात. ब्ल्यू बॉटल जेलीफिश हे विषारी असतात. त्यांचा आकार एका निळ्या पिशवी सारखा असतो. त्यांच्या दंशाने माणसाला असह्य अश्या वेदना होतात. जेलफीशने दंश केल्यानंतर त्या ठिकाणी बर्फ चोळून लिंबाचा रस लावावा.