मे अखेरपर्यंत ७५ टक्के गाळ उपशाचे टार्गेट; मिठी नदीतील ३० टक्के गाळ उपसा : २४९.२७ कोटींचा खर्च अपेक्षित

दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाईच्या कामाला मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरुवात होते. मात्र यंदा मार्च अखेरीस उजाडल्यानंतर नालेसफाईच्या कामाला सुरुवात झाली असून विविध कंत्राटदाराच्या माध्यमातून नाल्यातील गाळ उपसा करण्याच्या कामास सुरुवात झाली आहे.
मे अखेरपर्यंत ७५ टक्के गाळ उपशाचे टार्गेट; मिठी नदीतील ३० टक्के गाळ उपसा : २४९.२७ कोटींचा खर्च अपेक्षित
Published on

मुंबई : पावसाळ्यापूर्वी नाल्यातील गाळ उपसा करण्यास सुरुवात झाली आहे. एप्रिल अखेरपर्यंत ३५ टक्के तर मे अखेरपर्यंत ४० टक्के असा एकूण ७५ टक्के गाळ उपसा करण्याचे लक्ष्य असून आतापर्यंत लहान मोठ्या नाल्यातील ५ टक्के गाळ उपसा करण्यात आला आहे. नाल्यातील गाळ उपसा करण्यासाठी १८० कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाईच्या कामाला मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरुवात होते. मात्र यंदा मार्च अखेरीस उजाडल्यानंतर नालेसफाईच्या कामाला सुरुवात झाली असून विविध कंत्राटदाराच्या माध्यमातून नाल्यातील गाळ उपसा करण्याच्या कामास सुरुवात झाली आहे. मुंबईत छोटे नाले, मोठे नाले आणि रस्त्यालगतच्या जलवाहिन्या, पाणी निचरा होण्याच्या ठिकाणांत येणारी माती, घाण, कचरा, गाळामुळे अनेक वेळा पाणी भरल्याचे प्रकार घडतात. छोटे नाले व रस्त्यालगतच्या पर्जन्य जलवाहिन्यातून सांडपाणी आणि काही प्रमाणात गाळ वाहून नेला जातो. मात्र छोट्या नाल्यांचा काही भाग भरती-ओहोटी भागात येत असल्यामुळे पाण्याचा निचरा न होता गाळ साचून राहतो. त्यामुळे पावसाळ्यात या नाल्यांतील पाणी शहरात जमा होते. त्यामुळे पालिकेच्या माध्यमातून पावसाळ्याआधी नालेसफाईचे काम हाती घेण्यात येते.

दरवर्षी मार्चच्या सुरुवातीला नालेसफाई सुरू केली जाते. मात्र यंदा नालेसफाईच्या कामाची वर्क ऑर्डर दिल्यानंतर आता कामाला सुरुवात न झाल्याने ३१ मे अखेरपर्यंत ७५ टक्के नालेसफाई होणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

कंत्राटदाराला गाळाच्या वजनानुसार पैसे

पालिकेच्या अटीनुसार गाळ काढणे, साठवणे, वाहून नेणे व त्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी कंत्राटदारावर राहणार आहे. कंत्राटदाराने काढलेल्या गाळाच्या वजनानुसारच कामाचे पैसे दिले जाणार आहेत. शिवाय कंत्राटदाराच्या कामावर नजर ठेवण्यात येईल.

तक्रारीसाठी १ एप्रिलपासून डॅशबोर्ड

आपल्या विभागातील नाल्यांच्या सफाईची माहिती नागरिकांना मिळावी, यासाठी १ एप्रिलपासून डॅशबोर्ड सुरू करण्यात येणार आहे. या डॅशबोर्डवर नागरिकांना नालेसफाईबाबतच्या तक्रारीही करता येणार आहेत. डॅशबोर्डवर नाल्याचा फोटो टाकल्यास पालिका तातडीने कार्यवाही करणार आहे.

निवडणूक ड्युटीमुळे कसरत

लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी पालिकेचा सुमारे ५० हजारांहून जास्त कर्मचारीवर्ग जाणार आहे. त्यामुळे नालेसफाईसह सर्वच कामांवर देखरेख ठेवण्यासाठी पालिकेला कसरत करावी लागणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. देखरेखीसाठी मनुष्यबळाबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे.

३० एप्रिलला आढावा बैठक

३० एप्रिल अखेरपर्यंत ३५ टक्के गाळ उपसा करण्याचे टार्गेट असून याचा सविस्तर आढावा घेण्यासाठी ३० एप्रिल रोजी आढावा बैठक घेण्यात येणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in