
पावसाळ्यापूर्वी नालेसफाईच्या कामाला वेग आला असून, मोठ्या नाल्यांबरोबर लहान नाल्यांचे काम प्रगतिपथावर आहे. तीन हजार किलोमीटरच्या लहान नाल्यांतील ९५ टक्के गाळ काढण्यात आला आहे. उर्वरित पाच टक्के गाळ पुढील दोन दिवसांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे पालिकेच्या पर्जन्यवाहिनी विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.
मुंबईत दरवर्षी मार्चच्या मध्यावर सुरू होणारे नालेसफाईचे काम यावर्षी उशिरा सुरू झाले. ७ मार्च रोजी पालिकेत निवडून आलेल्या नगरसेवकांची मुदत संपल्याने नालेसफाईचे प्रस्ताव मंजुरीसाठी रखडले होते; मात्र प्रस्तावांना मंजुरी मिळाल्यानंतर ११ एप्रिलला कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली. यावर्षी वेळ कमी असल्यामुळे तीन शिफ्टमध्ये काम करण्याचे आदेश कंत्राटदारांना देण्यात आले होते. नालेसफाईवर नजर ठेवण्यासाठी सर्व सातही परिमंडळात भरारी पथक आणि तक्रार करता यावी, यासाठी डॅशबोर्डही सुरू करण्यात आला आहे.